अवघ्या महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा होत आहे. याच कालावधीत मोहरम आल्याने पुण्यातील हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी खडकी येथे एकत्र येऊन हे दोन्ही सण मोठ्या उत्साहात एकाच मांडवात साजरे केले. यावर्षी ३१ वर्षानंतर मोहरम आणि गणेशोत्सव हे एकाच कालावधीत आले आहेत. अशारितीने मुस्लिम आणि हिंदू एकत्रित नांदत असल्याचे पाहून सगळीकडे कौतुक होत आहे. खडकी येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मधला बाजार मित्र मंडळ आणि पैलवान ताजिया यांनी एकत्र येऊन हे उत्सव साजरे केले.

या दोन्ही समाजातील बांधवांनी मिळून पहिल्यांदा ‘ताजे’ आणि ‘पंजे’ यांची तर दुसऱ्या दिवशी वाजतगाजत दोन्ही समाजाने गणपती बाप्पाची भक्ती भावाने प्राणप्रतिष्ठा केली. पंजेला मुस्लिम समाजात सवारी म्हणतात. याठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येणारे भक्त हे ताजे, पंजे यांचं दर्शन घेतात. तर ताजे आणि पंजे यांचं दर्शन घ्यायला येणारे मुस्लिम बांधवही बाप्पाचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत. हा योगायोग १९८६ नंतर आता जुळून आला आहे. १९८४,८५,८६ या वर्षात तीन ते चार दिवसांच्या फरकाने मोहरम आणि गणेशोत्सव साजरा झाला होता. येणाऱ्या वर्षात देखील तीन चार दिवसांचा फरक असणार आहे. त्यामुळे यंदाचा उत्सव दोन्ही समाजांचे प्रतिनिधित्व करणारा असा खास आहे.