शिवाजी खांडेकर, पिंपरी

केंद्र सरकारच्या सर्वात जुन्या आणि सध्या अडचणीत असलेल्या हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एच. ए.) कंपनीच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट संपत नसल्याने कंपनी अडचणीच्या नव्या गर्तेत सापडली आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अंशदानाची (गॅ्रच्युइटी) ५२ कोटी रुपयांची रक्कम कंपनी देय असल्यामुळे कंपनीच्या जागेच्या सातबारा उताऱ्यावर हा ५२ कोटींचा बोजा चढविण्यात आला आहे. या निर्णयामुळे कंपनीला भविष्यात जागा विक्री करण्यासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

पिंपर येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक कंपनी कर्जाच्या बोजाखाली दबली आहे. कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या सोळा महिन्यांपासून थकले आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला एप्रिल २०१८ पासून पाच हजार रुपये इतकी तोकडी रक्कम अनामत रक्कम म्हणून देण्यात येत आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वतीने अनेक वेळा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी तोकडी मदत देऊन कर्मचाऱ्यांची बोळवण करण्यात आली. एप्रिल २०१७ मध्ये केंद्र सरकारने शंभर कोटी दिल्यामुळे २८ महिन्यांचे थकलेले वेतन कर्मचाऱ्यांना मिळाले. मात्र, त्यानंतर कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. कंपनीमध्ये सध्या एक हजार पन्नास कर्मचारी काम करतात.

एचए कंपनीमधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अंशदानाची रक्कम मिळाली नव्हती. त्या सर्व तीनशे कर्मचाऱ्यांनी संघटना करून कामगार न्यायालयात धाव घेतली होती. सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना अंशदानाची रक्कम देण्याचे आदेश कामगार न्यायालयाने दिले होते. आदेश देऊनही कंपनीने कर्मचाऱ्यांच्या अंशदानाची रक्कम दिली नाही.

त्यामुळे न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन अंशदानाची रक्कम वसूल करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाने कंपनीला तीन वेळा नोटीस देऊनही कंपनीने अंशदानाची रक्कम जमा केली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीच्या जागेच्या सातबाऱ्यावर ५२ कोटी ९८ लाख रुपयांचा बोजा चढविण्याचा निर्णय घेतला. सातबाऱ्यावर बोजा चढविण्याची कारवाई बुधवारी करण्यात आली. त्यामुळे कंपनीच्या अडचणीमध्ये भर पडली आहे. अडचणीतील कंपनी सुस्थितीत आणण्यासाठी केंद्र सरकारने जागा विक्री करण्याचा विचार केला होता. त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली होती. मात्र, त्यात कंपनीला यश आले नाही. आता कंपनीच्या जागेवर बोजा चढविण्यात आल्यामुळे जागा विक्री करण्यासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

एचए कंपनीमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अंशदानाची रक्कम कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेली नाही. कामगार न्यायालयाच्या आदेशानुसार कंपनीच्या जागेच्या सातबाऱ्यावर ५२ कोटी ९८ लाख रुपयांचा बोजा चढविण्यात आला आहे.

 – गीतांजली शिर्के, तहसीलदार, पिंपरी