17 July 2019

News Flash

मजुराला मारहाण करत मानवी विष्ठा खाण्यास पाडले भाग, आरोपी मालक अटकेत

पीडित मजुराने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली

संग्रहित छायाचित्र

विटभट्टीवरील मजूर त्याच्या कुटुंबासह जेवण करून बसल्याचा राग मनात धरून मजुराला बेदम मारहाण करत मानवी विष्ठा खाण्यास भाग पडल्याची संतापजनक घटना हिंजवडी परिसरात घडली आहे. आरोपी मालक संदीप पवार याच्याविरोधात पीडित २२ वर्षीय मजुराने फिर्याद दिली असून हिंजवडी पोलिसात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप पवार याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २२ वर्षीय मजूर हा आई, वडील, आजोबा आणि आजीसोबत हिंजवडी जवळील जांबे येथील आरोपी संदीप पवार याच्या विटभट्टीवर काम करतात. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास पीडित मजूर आणि त्याचे कुटुंब हे जेवण करून बसले होते. काही वेळाने आरोपी मालक संदीप पवार आला आणि त्याने काम करायला सुरू करा असे सांगितले. यावर मजुराने आत्ताच जेवण केलं आहे थोडं बसतो असे सांगितले असता मालकाने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावर मजुराने देखील शिवीगाळ केली.

वाद वाढत गेल्यानंतर आरोपी संदीप पवार याने त्याच्या पत्नीला घमेल्यात मानवी विष्ठा आणण्यास सांगितली. विष्ठा घेऊन आल्यानंतर मजुराला बेदम मारहाण करत विष्ठा खाण्यास संदीप पवार याने भाग पाडले. दरम्यान,या संतापजक घटने प्रकरणी पीडित मजुराने हिंजवडी पोलिसात धाव घेत फिर्याद दिली आहे. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि अटकेची कारवाई करण्यात आली.

First Published on March 15, 2019 10:31 am

Web Title: hinjawadi police arrest a person for beating worker