छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास शौर्य व पराक्रमाचा आहे. ‘शंभूराजे’ या महानाटय़ाद्वारे तो इतिहास नागरिकांसमोर आणण्याचे शिवधनुष्य प्रा. नितीन बानुगडे यांनी पेलले आहे, असे प्रतिपादन विधानसभेचे सभापती दिलीप वळसे पाटील यांनी मोशीत केले.
मोशीच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या मैदानावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘शंभूराजे’ या महानाटय़ास सुरूवात झाली. वळसे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले, तेव्हा ते बोलत होते. या वेळी आमदार विलास लांडे, महापौर मोहिनी लांडे, नगरसेवक संजय वाबळे, शरद बोऱ्हाडे, राम फुगे, श्याम आगरवाल, रहिमतपूरचे नगराध्यक्ष सुनील माने आदींसह मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.
जवळपास ४०० कलावंतांच्या साहाय्याने भव्य रंगमंचावर शंभूराजांचा जन्म ते बलीदान असा प्रवास सुरेख सादर करण्यात आला. रंगमंचावर हत्ती, घोडे, उंट यांचे सादरीकरण तसेच पालखी, मर्दानी खेळ, पारंपरिक कलाप्रकार व नृत्य ही महानाटय़ाची वैशिष्टय़े ठरली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक, औरंगजेब व संभाजी महाराज यांच्यातील जुगलबंदी आणि संभाजी महाराजांचे बलिदान हे प्रसंग प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. विश्वास काशीद यांनी स्वागत केले. भाऊसाहेब कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश फुगे यांनी आभार मानले.