पश्चिम महाराष्ट्रातील एचआयव्हीबाधितांसाठीचे प्रमुख केंद्र असलेल्या ‘ससून एआरटी केंद्रा’ला सध्या ‘सेकंड लाईन’ गोळ्यांचा तुटवडा जाणवतो आहे. लांबून येणाऱ्या रुग्णांना ‘सेकंड लाईन’चे एकच औषध घेऊन परतावे लागत असून एक औषध बाहेरून विकत घ्यावे लागते.
‘सेकंड लाईन’ गोळ्यांच्या पुरवठय़ाचा प्रश्न गेल्या ९ ते १० महिन्यांपासून वारंवार डोके वर काढतो आहे. सोलापूरचे रुग्ण लक्ष्मण वाघमारे (नाव बदलले आहे) यांनाही बुधवारी गोळ्या विकत घ्याव्या लागल्या. ‘लोकसत्ता’शी बोलताना ते म्हणाले,‘गोळ्या न मिळाल्यामुळे ७५० रुपयांचा अतिरिक्त खर्च आलाच. गेले ३ ते ४ महिने हे औषध मी विकतच घेतो आहे.’
अहमदनगरचे रुग्ण रमेश चिंचोके (नाव बदलले आहे) देखील ससूनमध्ये गोळ्यांसाठी आले होते. ते म्हणाले,‘मलाही बाहेरून गोळ्या घेण्यास सांगितले आहे. अधिक किमतीचे एक औषध तूर्त मिळाले एवढाच दिलासा आहे. दुसऱ्या औषधासाठी मला महिन्याला ८०० ते ९०० रुपयांचा खर्च येणार आहे.
बीडचे रुग्ण राजेश बारगजे (नाव बदलले आहे) म्हणाले,‘हलाखीची परिस्थिती असणारे ज्या गोळ्या विकत घ्याव्या लागतात त्या ते घेतच नाहीत. पैशांअभावी गोळ्या वगळणे घातक आहे. यामुळे ते ‘थर्ड लाईन’ पातळीवर जाण्याची शक्यता असते.’
या केंद्राचे प्रमुख डॉ. डी. बी. कदम म्हणाले,‘औषध पुरवठा सध्या काहीसा अनियमित असून एक महिन्याऐवजी १५ किंवा ७ दिवसांचे औषध द्यावे लागते. ‘टीएल’ आणि ‘एसएल’ गोळ्यांचा पुरवठा न झाल्यामुळे पर्याय म्हणून रुग्णांना गोळ्या विकत घेण्यास सांगण्यात आले होते. ‘पीआय’ नावाचे औषध महाग असून ते रुग्णांना दिले आहे.’