दुर्घटनाग्रस्तांना अतिरिक्त नुकसान भरपाई मिळू शकणार

पुणे : शाहीर अमर शेख चौकामध्ये फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचे नातलग आणि जखमींना वाढीव नुकसान भरपाई मिळण्यासाठी या प्रकरणात सदोष मनुष्यवधासह रस्ते अपघाताची कलमे लावण्याचे अखेर मान्य करण्यात आले आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला असून, याबाबतच्या कार्यवाहीसाठी पोलिसांना दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या निर्णयामुळे दुर्घटनाग्रस्तांना अतिरिक्त नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकणार आहे.

रेल्वेच्या जागेत असलेला फलक कोसळून ५ ऑक्टोबरला चार जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत दहा जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचप्रमाणे रेल्वेकडून मृतांच्या नातलगांना प्रत्येकी पाच लाख, तर गंभीर जखमींना एक लाख रुपयांची मदत देण्यात आली. मात्र, दुर्घटनेत बळी गेलेल्यांचा व्यवसाय आणि त्यांचे वयोमान लक्षात घेता त्यांना वाढीव नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी या प्रकरणात रस्ते अपघातानुसार कलमे लावावीत. त्यानुसार वाढीव नुकसान भरपाई मिळू शकेल, अशी मागणी सुरुवातीला आम आदमी रिक्षा संघटनेने केली. त्यासाठी आंदोलनही करण्यात आले. मात्र, पोलीस मागणीला दाद देत नसल्याने संघटनेने याबाबत न्यायालयीन लढाई देण्याचा निर्णय घेतला होता.

पालकमंत्री बापट यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, आम आदमी रिक्षा संघटनेचे श्रीकांत आचार्य आणि पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. फलक दुर्घटनेमध्ये सदोष मनुष्यवधासह रस्ते अपघाताची कलमे न लावून पोलिसांकडून रेल्वेला वाचविण्यात येत असल्याचा आरोप बैठकीत आचार्य यांनी केला. मात्र, दुर्घटनाग्रस्तांना अतिरिक्त मदत मिळवून देण्यासाठी आपण सकारात्मक असल्याचे बापट आणि जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे याबाबत कायदे सल्लागाराशी बोलून निर्णय घेण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानुसार यासाठी दहा दिवसांची मुदत देण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.

फलक दुर्घटनेत सदोष मनुष्यवधासह रस्ते अपघाताची कलमे लावण्याबाबत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय झाला. सातत्याने मागणी करूनही पोलिसांकडून याबाबत चलढकल करण्यात येत होती. आरोपपत्र दाखल होण्यापूर्वी या प्रकरणात रस्ते अपघाताची अतिरिक्त कलमे लावल्यास अधिकच्या नुकसान भरपाईसाठी दावा करता येईल.

– श्रीकांत आचार्य, आम आदमी रिक्षा संघटना मार्गदर्शक