‘रंग बरसे… भीगे चुनरवाली… रंग बरसे’, ‘होली के दिन दिल खिल जाते है’, ‘आज ना छोडेंगे बस हमजोली खेलेंगे हम होली’ अशा काही निवडक हिंदी गाण्यांसह ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी, ‘राधिके जरा जपून जा तुझ्या घरी’, ‘अग नाच नाच राधे उडवू या रंग’, अशा मराठी गाण्यांवर मनमुराद थिरकत आणि मनसोक्त रंगांची उधळण करीत गुरुवारी पुण्यात विशेष मुलांनी धुळवड साजरी केली.

भोई प्रतिष्ठानकडून अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमात देवदासी, अनाथ, अंध-अपंग यांसह विविध घटकातील तब्बल १२०० विशेष मुले सहभागी झाली होती.

या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत भोई प्रतिष्ठानचे मिलिंद भोई म्हणाले, यंदा ‘रंग बरसे’ उपक्रमाचे हे २५ वे वर्ष आहे. या विशेष मुलांच्या आयुष्यात विविध रंगी उधळण व्हावी आणि त्यांनाही धुळवडीच्या सणाचा आनंद लुटता यावा, यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यंदा या उपक्रमात पुणे शहरातील १२०० मुले सहभागी झाली आहे.