अतिरिक्त पैसे भरूनही गैरसोयच; १५ ते ३० तासांपर्यंत विलंब

हिवाळी पर्यटनाच्या निमित्ताने नियमित रेल्वे गाडय़ा फुल्ल झाल्यामुळे पुण्यातून सोडण्यात आलेल्या ‘हॉलिडे स्पेशल’ प्रकारातील गाडय़ांच्या वाहतुकीचा सध्या पुरता बोजवारा उडाला असून, या गाडय़ा बैलगाडय़ाच ठरत आहेत. मुख्य मार्गावर या गाडय़ा कोठेही थांबविण्यात येत असल्याने या गाडय़ांना पंधरा ते तीस तासांचा विलंब होत असून, त्यामुळे प्रवाशांच्या सहलीचे नियोजन कोलमडून पडत आहे. या गाडय़ांसाठी अतिरिक्त पैसे देऊनही गैरसोय सहन करावी लागत असल्याने प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

[jwplayer zVOMyVTv]

हिवाळी पर्यटनासाठी पुण्यातून जम्मू, बनारस आदी ठिकाणी जाण्यासाठी चांगली मागणी आहे. साधारत: डिसेंबर अखेपर्यंत हिवाळी पर्यटनाला मागणी आहे. देशातील सर्वच प्रमुख ठिकाणी जाण्यासाठी पुणे स्थानकातून नियमित सुटणाऱ्या गाडय़ा आहेत. मात्र, हिवाळी पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्यांची मागणी पाहता ‘हॉलिडे स्पेशल’ प्रकारातील गाडय़ा सोडण्यात येतात. त्यानुसार जम्मूतावी, बनारससह काही ठिकाणी पुण्यातून  दिवाळीच्या पूर्वीपासून गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. मात्र, या गाडय़ांच्या वाहतुकीची स्थिती अत्यंत दयनिय व प्रवाशांना त्रासदायक असल्याचे वास्तव आहे.

पुण्यातून सुटणाऱ्या सर्वच ‘हॉलिडे स्पेशल’बाबत रोजच काहीतरी समस्या निर्माण होत आहेत. काही गाडय़ा रद्द होतात, तर काहींना चक्क दीड-दोन दिवसांचा विलंब होत आहे. सर्वाधिक मागणी असलेल्या जम्मूतावी ‘हॉलिडे स्पेशल’चा तर आता प्रवासच नको, अशी प्रतिक्रिया प्रवासी देत आहेत. मार्गामध्ये मुख्य वाहतुकीसाठी या गाडय़ा बाजूला टाकल्या जातात. गंभीर म्हणजे स्थानकाशिवाय रात्री मार्गामध्ये कोणत्याही ठिकाणी गाडय़ा थांबविल्या जातात. या ठिकाणी कधीकधी प्रवाशांना पाणीही उपलब्ध होत नाही. मार्गात अनेकदा गाडय़ा थांबवून ठेवल्या जात असल्याने इच्छितस्थळी गाडी पोहोचण्यास नियोजित वेळेपेक्षा उशीर होतो. गाडीच्या नियोजित वेळेनुसार प्रवाशांनी पुढील प्रवास किंवा हॉटेलच्या बुकिंगचे नियोजन केलेले असते. मात्र, गाडय़ांना कमालीचा उशीर होत असल्याने सहलीचे पुढेच सगळेच गणित कोलमडून पडते. त्यामुळे नियोजन होत नसेल, तर या गाडय़ा सोडणे बंद करून टाकावे व नियमित गाडय़ा वाढविण्यावर भर द्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

हॉलिडे स्पेशल गाडय़ांसाठी अतिरिक्त पैसे आकारले जातात, मात्र हे पैसे देऊन प्रवाशांना गैरसोय पदरी पाडून घ्यावी लागते आहे. प्रत्येक स्पेशल गाडी उशिराने धावत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवासी रितसर तिकीट काढून प्रवास करीत असेल, तर त्याला योग्य सुविधा दिलीच पाहिजे. रात्री कुठेही गाडय़ा थांबविल्या जात असल्याने एखादी गुन्हेगारी घटना घडल्यास त्याची जबाबदारी कुणाची? नियोजन होत नसेल, तर नियमित गाडय़ांची संख्या वाढवावी. त्याचप्रमाणे डब्यांची संख्या वाढवून अतिरिक्त प्रवाशांबाबत नियोजन करावे.

– हर्षां शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप

[jwplayer y8Pn2zMM]