गुरुवारपासून घरपोच मद्यविक्री

पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी संकेतस्थळावरून ई-टोकन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.पहिल्याच दिवशी मद्य ग्राहकांचा चागला प्रतिसाद पाहायला मिळाला. यामुळे मद्यविक्री दुकानांमध्ये होणारी ग्राहकांची गर्दी कमी होण्यास मदत होत आहे.  आदेशाची अंमलबजावणी पुण्यात येत्या गुरुवारपासून (१४ मे) करण्यात येणार आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यविक्री दुकानांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून खास संकेतस्थळ विकसित केले आहे. त्याद्वारे ई-टोकन सुविधा उपलब्ध केली आहे. ही सुविधा ६६६.ेंँंी७्र२ी.ूे  या संकेतस्थळावर सुरू आहे.   पहिल्याच दिवशी सुमारे हजारपेक्षा अधिक ग्राहकांनी नोंदणी करत ई-टोकन घेतले. संकेतस्थळावर जाऊन ग्राहकाने मोबाइल क्रमांक व नाव नमूद करायचे आहे. त्यानंतर  जिल्हा आणि पिनकोड टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानुसार ग्राहकाला नजीकच्या मद्यविक्री दुकानांची यादी दिसेल. त्यापैकी एका दुकानाची निवड केल्यानंतर विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड ग्राहकाला करता येणार आहे. माहिती नमूद केल्यानंतर ग्राहकाला ई-टोकन मिळेल. त्याआधारे ग्राहक  सोयीच्या वेळी संबंधित दुकानात जाऊन मद्य खरेदी करू शकणार आहे.   पुण्यात प्रतिबंधित क्षेत्रात ही सुविधा दिली जाणार नाही.  घरपोच मद्य पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी, ओळखपत्र ; तसेच मद्य बाळगणे, वाहतूक करणे यासाठी परवानगी देण्यासाठी एक दिवसाचा कालावधी लागणार असल्याने १४ मेपासून सकाळी दहा वाजल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकेल, असे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

घरपोच मद्यपुरवठा करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी कशी करायची, याबाबत आयुक्त कार्यालयाकडून सूचना दिल्या जाणार आहेत. त्यानंतर मद्य बाळगणे आणि वाहतूक करणे याबाबतची परवानगी देण्याची कार्यवाही सुरू केली जाईल.

– संतोष झगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग