अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा देशात दौरा सुरु असताना राजधानी दिल्लीत दंगल होतेच कशी? हे सर्वोतोपरी केंद्राच्या गृहमंत्रालयाच अपयश आहे. गृहमंत्री अमित शाह यांना जर हे सांभाळणं जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी प्रतिक्रिया खासदार सु्प्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना दिली. ईशान्य दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्याचे (सीएए) समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये सोमवारी वाद होऊन हिंसाचार झाला होता, या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.

सुळे म्हणाल्या, “दिल्लीतील हिंसाचाराची घटना ही धक्कादायक आहे. दिल्लीमध्ये ट्रम्प साहेबांचा  मोठा दौरा सुरु असताना तिथे दंगल होतेच कशी? हे सर्वतोपरी गृहमंत्रालयाचं अपयश आहे. याचं स्पष्टीकरण गृहमंत्री अमित शाहा यांनी देशाला द्यावं. गुप्तचर यंत्रणा कुचकामी ठरतेच कशी? जर त्यांना हे जमत नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.”

पुरोगामी महाराष्ट्रात श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये गल्लत होतेय

“पुरोगामी महाराष्ट्रात श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये गल्लत व्हायला लागली आहे. माझ्यासाऱखी पिढी ही अंधश्रद्धेविरोधात काम करणारी शेवटची पिढी असल्याची भीती आता मला वाटायला लागली आहे. आज डॉ. नरेंद्र दाभोलकर नाहीत याची पोकळी सातत्याने जाणवत आहे. दाभोलकरांनंतर याविरोधात काम करण्यात आम्ही कमी पडत आहोत की काय असं वाटत आहे. सध्याची सुशिक्षित पिढी अंधश्रद्धेमध्ये कशी काय अडकते याचं खरचं मला आश्चर्य वाटतं,” अशा शब्दांत सुळे यांनी अंधश्रद्धेतून झालेल्या पिंपरी-चिंचवडमधील पाच बहिणींवरील बलात्कारप्रकरणी भाष्य केलं.

विरोधकांना पाच वर्षांसाठी शुभेच्छा

“विरोधकांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. ते अतिशय चांगल्यारीतीने विरोधीपक्षाचं काम करीत आहेत. आमचं सरकार हे दडपशाहीचं सरकार नाही. विरोधकांनी आता पाच वर्षे त्यांचं काम चांगल्या पद्धतीनं करावं. हिंगणघाटबाबत बोलताना सुळे म्हणाल्या, आपलं गृहखात सक्षम आहे. या प्रकरणी मुळाशी जाऊन काम करणाऱ्यांच्या सुचनांचा विचार करुन गृहमंत्रालय अशा घटना रोखण्याबाबत पुढे योग्य तो निर्णय घेईल.”