राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाला भेट दिली. या ठिकाणी कैद्यांनी आपल्या कुशल कारागिरीद्वारे विणलेली पैठणी साडी खास आपल्या पत्नीसाठी विकत घेतली. साडी विकत घेतल्यानंतर त्याची साडे नऊ हजार रुपयांची किंमतही त्यांनी देऊ केली.
येरवडा कारागृहात विविध वस्तूंची कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये कैद्यांमधील कारागिरीतील कौशल्याप्रमाणे विविध उत्पादनं घेतली जातात. ही उत्पादनं विकण्यासाठी कारागृहाचे एक विक्री केंद्रही आहे. या विक्री केंद्राला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट दिली.
पैठणी खरेदीबद्दल विचारले असता देशमुख म्हणाले, “तुरुंगात येणारा प्रत्येकजण जन्मजात किंवा सराईत गुन्हेगार नसतो. संतापाच्या भरात किंवा परिस्थितीमुळे काहींच्या हातून गुन्हा घडून जातो. त्यानंतर न्यायदेवतेने सुनावलेली शिक्षा तो भोगत असतो. पण म्हणून त्यांचा माणूस म्हणून जगण्याचा हक्क हिरावला जात नाही. केलेल्या चुकीची शिक्षा भोगून झाल्यावर त्यांना पुन्हा समाजात सामावून घ्यायचे असते. यासाठी त्यांना कारागृहात केलेल्या श्रमदानाचा स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी उपयोग होऊ शकतो. या केंद्रातून होणाऱ्या वस्तू विक्रीतून त्यांना मिळणारे उत्पन्न तुरुंगाबाहेरील नवे आयुष्य जगण्यास मदतीचे ठरू शकते, याच भूमिकेतून मी येरवडा कारागृहातील कैद्यांनी विणलेली पैठणी विकत घेतली.”
नागरिकांनीही या केंद्रातून त्यांच्या गरजेच्या वस्तू नियमित खरेदी कराव्यात. आपल्याच समाजातल्या वाट चुकलेल्या लोकांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असे आवाहनही देशमुख यांनी यावेळी केले. ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री महाराष्ट्र पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख या जबाबदारीमुळे मी पोलिस नियंत्रण कक्षात काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांसोबत होतो. पत्नी, कुटुंबासोबत मला राहता आले नाही. त्यामुळे ‘घरच्या मुख्यमंत्र्यां’चा नाराजी दूर करण्यासाठी मला या पैठणीचा उपयोग होईल, अशी मिश्किल टिप्पणीही गृहमंत्री देशमुख यांनी यावेळी केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 3, 2021 8:00 pm