देशात सर्वाधिक वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा उच्चांक नोंदविणारे शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव अण्णासाहेब देशमुख यांचे सोलापुरातील खासगी रुग्णालयात शुक्रवारी रात्री निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. देशमुख यांना काही दिवसांपूर्वी पित्ताशयाच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना कृत्रिम जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या निधानामुळे महाराष्ट्राने एक भीष्मपितामह गमावला असल्याची भावना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला नेता गमावला; गणपतराव देशमुखांना पवारांकडून श्रध्दांजली

गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, “गणपतराव देशमुख यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत ५० वर्षांपेक्षा जास्त काळ नेतृत्व केलं. हे करत असताना दुष्काळी भागातील लोकांचे प्रश्न, सर्वसामान्य माणसांचे प्रश्न हे त्यांनी नेहमी मांडायचं काम केलं. अतिशय विद्वान, अतिशय सेवाभावी, शांत अशी त्यांची भूमिका नेहमीच राहिली. एवढं असुनही अतिशय़ साधेपणाने राहणं व साधेपणाने कोणाच्याही समोर जाणं हे त्यांचे वैशिष्ट होतं. मला महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांच्यासोबत जवळपास २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी काम करायला मिळालं आणि काही दिवस तर महाराष्ट्राच्या विधानसभेत आम्ही दोघं एकाच बाकावर बसत होतो. त्यामुळे त्यांच्या शिकवणुकीचा खूप मोठा फायदा राजकारणातील प्रत्येक माणसाला झालेला आहे. आज गणपतराव देशमुखाचं निधन झाल्याने, महाराष्ट्राच्या राजकारणाची व लोकशाहीची खूप मोठी हानी झाली आहे.”

राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले – मुख्यमंत्री

तसेच “कुठल्याही प्रश्नाबाबत ते विधानसभेत तयारी करूनच येत होते. तयारी केल्याशिवाय ते सभागृहात कधी येत नव्हते आणि त्यानंतर अतिशय ठोसपणे ते त्यांचं मत मग ते सरकारला आवडो किंवा न आवडो ते मांडायचे. मी विधानसभेचा अध्यक्ष असताना देखील ते सभागृहात होते. त्यावेळी त्यांच्या अनेक उपयुक्त सूचना ज्या सरकारसाठी आमदरांसाठी आणि माझ्यासाठी देखील कायम राहिलेल्या आहेत व त्या सतत स्मरणात राहतील.” असं देखील वळसे पाटील यांनी यावेळी सांगितलं.

याचबरोबर, “त्यांना राजकारणातील भीष्मपितामह म्हणता येईल, युगपुरूष म्हणता येईल. अशा कितीही उपाध्या दिल्या आणि कितीही शब्द वापरले तरी ते त्यांच्यासाठी कमीच आहेत. आज त्यांच्या जाण्याने सगळी जनता शोकसागरात बुडालेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणचा जो चालता बोलता इतिहास होता, १९५२ पासून त्यांनी महाराष्ट्राचं सगळं राजकारण जवळून पाहिलेलं आहे. संघर्षाचं, विकासाचं राजकारण पाहिलेलं आहे. गणपतराव देशमुखांच्या रुपाने महाराष्ट्राने आज एक भिष्मपितामह गमावलेला आहे.” अशा शब्दांमध्ये गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भावना व्यक्त केल्या.