अनधिकृत बांधकामे, झोपडपट्टी पुनर्वसन, घरकुल, बीआरटीसह संरक्षणखात्याला १५८ कोटी रूपये देण्याच्या मुद्दय़ावरून सत्तारूढ राष्ट्रवादीला काँग्रेसने िखडीत गाठले  आहे. अनधिकृत बांधकामांच्या मुद्दय़ावर मते घेऊन निवडून आलेल्या आमदार-खासदारांनी नागरिकांची दिशाभूल केली असून नैतिकता असल्यास त्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
साठे म्हणाले,की एक एप्रिलपासून विशेष मोहिमेद्वारे अनधिकृत बांधकामे पाडण्यात येणार आहे. निवडून आल्यानंतर बांधकामांचा प्रश्न तातडीने सोडवू म्हणणाऱ्या भाजप-सेनेच्या नेत्यांनी नागरिकांची दिशाभूल केली आहे. राष्ट्रवादीनेही केवळ वल्गनाच केल्या. आणखी किती दिवस या प्रश्नावरून राजकारण होणार आहे? पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कुंटे समितीची स्थापना झाली, त्यानंतर भाजप-सेनेच्या सरकारने घोषणांशिवाय काहीच केले नाही. पाडापाडी सुरू झाल्यास आमदार-खासदारांनी राजीनामे द्यावेत. झोपडपट्टी पुनर्वसन व घरकुल अध्र्यातून गुंडाळण्याच्या राष्ट्रवादीच्या प्रयत्नास काँग्रेसचा तीव्र विरोध राहील. राष्ट्रवादीने ज्या मुद्दय़ांवर निवडणुका लढवल्या, त्यापासून ते घूमजाव करत आहेत. पूर्वघोषित घरे नागरिकांना न मिळाल्यास काँग्रेस तीव्र आंदोलन करेल. बीआरटीच्या कामात प्रचंड घोटाळे झाले आहेत. संरक्षण खात्याकडील जागा विकासकामांसाठी घेताना पालिकेने १११ कोटी रूपये त्यांना दिले. वास्तविक त्या जागा शेतकऱ्यांच्या आणि दिलेले पैसे करदात्या नागरिकांचे आहेत. ज्या जागा त्यांच्या नाहीतच, त्यासाठी पैसे देणे चुकीचे आहे, अशी काँग्रेसची भूमिका आहे. यासंदर्भात, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांना भेटणार आहे, असे साठे म्हणाले. यावेळी सद्गुरू कदम, ज्योति भारती, संग्राम तावडे, सुदाम ढोरे, श्यामला सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
चारही दिशेला कचरा डेपो हवेत
मोशीतील कचरा डेपोला विरोध सुरू असतानाच पुनवळ्यात होणाऱ्या डेपोलाही विरोध होऊ लागला आहे. भविष्यात पुण्याप्रमाणे िपपरीतही कचरा डेपोंना तीव्र विरोध होणार आहे. त्यासाठी शहराच्या चारही दिशेला कचरा डेपो झाले पाहिजेत, अशी मागणी सचिन साठे यांनी या वेळी केली.