शाळांबद्दलची असुरक्षितता, शिक्षण व्यवस्थेवर विश्वास नसणे, शाळांकडून होणारा त्रास अशा विविध गोष्टींवर आता अनेक पालकांनी मुलांना घरच्याघरी शिक्षण देण्याचा (होमस्कूलिंग) पर्याय निवडला आहे. राज्यात ‘होमस्कूलिंग’चा ट्रेंड झपाटय़ाने वाढत असून याबाबत काम करणाऱ्या विविध संस्था आणि संकेतस्थळांवर राज्यातील तीनशे ते चारशे पालकांनी नोंदणी केली असल्याचे समोर येत आहे. घरी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळाबाह्य़ समजण्यात येऊ नये, अशी मागणी करत पालकांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
गेल्या काही वर्षांत राज्यात महाराष्ट्रात ‘होमस्कूलिंग’चा ट्रेंड रुजत आहे. सध्या विविध संकेतस्थळे, अभ्यासगट या विषयांत काम करणाऱ्या संस्था यांवर राज्यातील ३०० ते ४०० पालकांनी नोंदणी केली आहे. होमस्कूलिंग करणाऱ्या पालकांच्या नुकत्याच झालेल्या देशपातळीवरील संमेलनासाठी राज्यातील साधारण दीडशे पालकांनी नोंदणी केली होती. त्याचप्रमाणे अनेक पालक यासाठी इच्छुक असल्याचे या संमेलनाच्या नियोजन समितीतील सदस्या शिल्पा परुळेकर यांनी सांगितले. ‘मुलाला कसे शिकवावे ही खासगी बाब आहे. त्यामुळे अनेक पालकांना आपण होमस्कूलिंग करतो हे समोर यावे असे वाटत नसते. त्यामुळे पालक पुढे येत नाहीत. मात्र, काही संकेतस्थळे किंवा विविध माध्यमातून पालक एकमेकांशी संपर्कात असतात. मात्र, सध्या विविध माध्यमातून नोंदणी झालेल्या पालकांव्यतिरिक्तही अनेक पालक होमस्कूलिंग करत आहेत.’
हव्या त्या विषयांचे किंवा मुलांना रस असलेल्या सर्वच विषयांचे शिक्षण मिळावे, अशा उद्देशाने घरी शिक्षण देण्याकडे पालक वळत आहेत. शाळेतील किंवा कोणत्याही बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये ठरावीक विषय असतात. ठरावीक विषय, प्रत्येक वर्षी त्यातील ठरावीक भागांचाच अभ्यास अशी साचेबद्धता घरी शिकवण्यात टाळता येते. परीक्षेसाठी किंवा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शिक्षण या रूढ झालेल्या संकल्पना न पटल्यामुळेही पालक होमस्कूलिंगचा पर्याय अवलंबत आहेत. पुणे, मुंबई, नागपूरसारख्या शहरांबरोबरच ग्रामीण भागापयर्ंत होमस्कूलिंगचा पर्याय अवलंबला जात आहे. मात्र, शासनाच्या व्याख्येनुसार या विद्यार्थ्यांना शाळाबाह्य़ ठरवण्यात आले आहे. शासनाच्या या धोरणाला पालकांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. नागपूर खंडपीठात याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

घरी शिक्षण देण्याची कारणे काय?
– शाळांबाबत असुरक्षितता वाटते.
– साचेबद्ध शिक्षण पटत नाही.
– वेगवेगळी परीक्षा मंडळे किंवा शिक्षण पद्धतींतील वेगवेगळ्या आवडलेल्या गोष्टी मुलांना एकत्र शिकवण्याची इच्छा.
– मुलांना संपूर्ण वेळ देता यावा.
– शाळेमुळे अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी मुलाला वेळ देता येत नाही.
– शाळेत विद्यार्थी जुळवून घेऊ शकला नाही म्हणून.
– कोणत्याही विशिष्ट विचारधारेचेच शिक्षण विद्यार्थ्यांला देणे पटत नाही.
– कलांना शाळांमध्ये विशेष प्राधान्य दिले जात नाही.
– शुल्क, प्रवेश प्रक्रिया, व्यवस्थापन अशा विविध गोष्टींबाबत शाळांची भूमिका पटत नाही.

‘‘ शासनाने शाळाबाह्य़ मुलांची जी व्याख्या केली आहे त्यामध्ये होमस्कूलिंग किंवा मुक्तशिक्षण हा घटकच लक्षात घेतलेला नाही. शाळेच्या भिंतीतील औपचारिक शिक्षण म्हणजेच फक्त शिकणे अशी भूमिका शासनाची दिसत आहे. त्याबाबत न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.’’
अॅड. असीम सरोदे, याचिकाकर्त्यांचे वकील