मुंबई एक्सप्रेसने लातूरहून पुण्याला आलेल्या एका निराधार वृद्धेची आयुष्यभराची पुंजी असलेले गाठोडे रेल्वेमध्येच विसरले.. म्हातारपणाचा आधार असलेले पैसे आणि सोन्याच्या दागिन्यांसह इतर ऐवज गेल्यामुळे त्या वृद्धेसाठी जणू आकाशच फाटले.. तिने रडतच हा प्रकार रेल्वे पोलिसांना सांगितला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे वृद्धेची आयुष्यभराची कमाई परत मिळाली. पोलिसांच्या प्रामाणिकपणाचे आभार मानून पोलीस हे आता आपले नातेवाईकच झाल्याची भावना या वृद्धेने व्यक्त केली.
मालन गणपत भोसले (वय ७०, रा. अंबिल ओढा झोपडपट्टी, पर्वती) या रविवारी मुंबई एक्सप्रेसने लातूरहून पुण्यात आल्या. मात्र, आपले गाठोडे रेल्वेतच राहिल्याचे त्या पुणे स्टेशनवर उतरल्यानंतर त्यांच्या लक्षात आले. सोन्याचे दागिने, रोख रक्कम, किसान विकासपत्रे असा चार लाख रुपयांचा ऐवज गाठोडय़ात होता. आयुष्यभराची व म्हातारपणाचा आधार असलेली ही पुंजीच गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेसाठी आकाशच फाटले. त्या रडत व ओरडतच पुणे रेल्वे पोलीस ठाण्यात गेल्या. या ठिकाणी असलेले ठाणे अंमलदार गेंगजे यांनी त्यांना शांत करून धीर दिला. घटनेची सर्व माहिती घेतल्यानंतर तत्काळ हा प्रकार पोलीस निरीक्षक अभय परमार यांना सांगितला.
रेल्वे पुणे स्थानक सोडून मुंबईकडे रवाना झाली होती. त्यामुळे परमार यांनी लोणावळा येथे कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक खरात यांना कळविले. ही रेल्वे लोणावळा रेल्वेस्थानकावर आल्यानंतर खरात यांनी त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी पाटील व भोई आणि सुतार यांना घेऊन गाडीच्या डब्यात वृद्धेच्या गाठोडय़ाचा शोध घेतला. काही वेळात हे गाठोडे त्यांना मिळाले. ही माहिती समजताच रेल्वे पोलिसांनी वृद्धेला लोणावळा येथे नेऊन त्यांच्या समक्ष गाठोडे उघडले असता, त्यामध्ये रोख ७० हजार, सोन्याचे दागिने असा चार लाखांचा ऐवज असल्याचे दिसून आले.
मालन भोसले यांच्या पतीचे निधन झाले असून त्यांचा एक मुलगा मनोरुग्ण आहे. त्यांना कोणाचाही आधार नाही. गावाकडे असलेल्या आठ एकर शेतीवरही दुसऱ्याने कब्जा केला आहे. पुण्यात पर्वती येथे घर असून त्यावरदेखील अतिक्रमण करण्यात आलेले आहे. मुलीचे लग्न झालेले असून ती पतीसह येरवडा परिसरात राहण्यास आहे. जगण्याचा सहारा परत मिळल्याने भोसले यांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले. पुणे रेल्वे विभागाचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी रेल्वे पोलिसांच्या प्रामाणिकपणामुळे व कर्तव्याबद्दल त्यांना रिवॉर्ड जाहीर केले आहे.