केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे सहकार्य

चिन्मय पाटणकर, पुणे</strong>

निसर्गचक्रातील महत्त्वाचा घटक असलेल्या मधमाशीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी पुढाकार घेतला आहे. केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात मधमाशी पालनासाठी काही पेटय़ा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पोलिसांच्या अखत्यारितील अन्य जागांवरही मधमाशी पालन करण्याचे नियोजन आहे.

राज्यभरातील तुरुंग अधिकाऱ्यांना मधमाशी पालनाचे प्रशिक्षण काही महिन्यांपूर्वी देण्यात आले होते. त्यानंतर आता पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी त्यांच्या क्वीन्स गार्डन भागातील प्रशस्त बंगल्याच्या आवारात मधमाशी पालनासाठी पेटय़ा ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्या दृष्टीने मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे संचालक दीप वर्मा यांच्यासह नुकतीच त्यांची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी बंगल्यात मधमाश्यांच्या पेटय़ा ठेवण्यासह पोलिसांच्या अन्य जागाही उपलब्ध करून देण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. या जागांवर कशा पद्धतीने मधमाशी पालन करता येईल, याची प्राथमिक बोलणी या बैठकीत झाली.

‘पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी मधमाशी पालनासाठी पेटय़ा ठेवण्यासाठी स्वतहून विचारणा केली. त्यामुळे त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी या संदर्भात चर्चा झाली. या बैठकीत त्यांच्या बंगल्यात मधमाश्यांच्या पेटय़ा ठेवण्याचे निश्चित झाले आहे. त्यांच्या बंगल्याच्या आवारात भरपूर झाडी आहे. तसेच पोलिसांच्या अखत्यारितील अन्य जागांबाबत लवकरच नियोजन करून पेटय़ा ठेवण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल,’ असे वर्मा यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

निसर्गाप्रती असलेल्या प्रेमातून मधमाशी पालनाचा विचार पुढे आला. मध हे मेहनत आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. मधमाश्यांचे कार्य सर्वसामान्यांसाठीही प्रेरणादायी आहे. फुलातून अलगदपणे मकरंद संकलित करताना ती कोणत्याही प्रकारे निसर्गाला हानी पोहोचवत नाही, तर निसर्गाला मदतच करते.

– डॉ. के. वेंकटेशम, पोलीस आयुक्त, पुणे