राज्य शासनाच्या वतीने लोककलावंतांना दिले जाणारे मानधन गेल्या सात महिन्यांपासून रखडल्याने पुरंदरमधील वृद्ध लोककलावंतांची उपासमार सुरू झाली आहे. तालुक्यातील कलावंतांना जानेवारी महिन्यापासून एक रुपयाही मानधन मिळालेले नाही. कलावंतांचे मानधन १५ ऑगस्टपासून दीडपट करण्याची घोषणा शासनाने नुकतीच केली, परंतु मानधनच थकल्यामुळे कलावंत अडचणीत आले आहेत.
जेजुरीमधील प्रसिद्ध तमाशा कलावंत बाबुराव रामचंद्र अवसरीकर यांचा सन २००२ मध्ये मानधनाअभावी उपासमारीने मृत्यू झाला होता. त्याचे पडसाद विधानसभेतही पडसाद उमटले होते. त्यानंतर मात्र बरीच वष्रे कलावंतांचे मानधन वेळेवर मिळाले. परंतु आता पुरंदर तालुक्यातील कलावंतांच्या मानधनाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. पुरंदर तालुक्यात १५० कलावंत आहेत. त्यापैकी जेजुरीत जवळपास ८० जण आहे. त्यांना शासनाचे मानधन मिळते.
 
‘‘मानधनात वाढ केल्याचा आनंद आहे पण निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन जशी महिन्याला मिळते तशा प्रकारे शासनाने कलावंतांच्या मानधनाचे पसे प्रत्येक महिन्याला द्यावे. तरच खऱ्या अर्थाने कलावंतांना न्याय दिल्यासारखे होईल.’’
पुष्पाताई जेजुरीकर (वय- ७५ वर्षे; जुन्या पिढीतील लावणी गायिका)