कायद्याचे ज्ञान असलेल्या भास्करराव आव्हाड यांच्याकडे समाजाचे भान आहे. त्यामुळेच त्यांनी वकिलीचा व्यवसाय होऊ दिला नाही, असे मत वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी रविवारी व्यक्त केले.
ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. भास्करराव आव्हाड यांनी ७१ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त आडकर फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात रामदास फुटाणे यांच्या हस्ते आव्हाड यांचा सत्कार करण्यात आला. शाहू मोडक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रतिभा शाहू मोडक, प्रसिद्ध गायक उपेंद्र भट आणि प्रमोद आडकर या वेळी उपस्थित होते. उत्तरार्धात गुरुवंदना हे निमंत्रित कवींचा सहभाग असलेले कविसंमेलन सादर झाले.
रामदास फुटाणे म्हणाले, दुष्काळाच्या झळा सोसून पुण्यात आलेल्या आव्हाड यांनी येथे आपला गोतावळा निर्माण केला. त्यांचे लेखनही वैविध्यपूर्ण आहे. अस्थिर राजकारण, मुक्त अर्थव्यवस्था आणि काही मूठभर कुटुंबांच्या हाती गेलेली राजकीय सत्ता अशी देशाची सध्यस्थती आहे. इंग्रजांप्रमाणेच सध्याच्या राजकारण्यांनी कंपन्यांच्या माध्यमातून देशाची सत्ता काबीज केली आहे. कान्होपात्राला क्लिओपात्रा करणारी अर्थव्यवस्था अडचणीत आली असून या देशी इंग्रजांना कसे हाकलणार हा खरा प्रश्न आहे. आव्हाड यांच्या लेखनात हे प्रश्न दिसतात.
आजवर पुण्याने मला भरभरून प्रेम, सदिच्छा असे खूप काही दिले. हे प्रेम जीवनात ऊर्जा टिकवून ठेवत असल्याने सदैव या प्रेमातच राहायला आवडेल, अशी भावना भास्करराव आव्हाड यांनी व्यक्त केली. अंजली महागावकर यांनी सूत्रसंचालन केले.