विद्यार्थ्यांसाठी आखलेल्या एखाद्या योजनेची मूळ संकल्पना स्वहितासाठी कशी वापरायची याचा ‘आदर्श नमुना’ महापालिका शिक्षण मंडळाने निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांना बागकामाची माहिती व्हावी आणि त्यांना निसर्गाची ओळख व्हावी यासाठी आखण्यात आलेल्या प्रशिक्षण योजनेला भलतेच वळण देण्यात आले आणि योजनेची मजल थेट कुंडय़ांच्या खरेदीतील भ्रष्टाचारापर्यंत गेली.
पुणे महापालिका शिक्षण मंडळात झालेला कुंडय़ा खरेदीतील भ्रष्टाचार सध्या गाजत आहे. बाजारात जी कुंडी जास्तीतजास्त शंभर रुपयांना मिळते तशा कुंडय़ांची खरेदी मंडळाने एक हजार रुपयांना एक याप्रमाणे केली असून शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रवी चौधरी आणि मंडळाचे प्रमुख तुकाराम सुपे यांची या खरेदीबाबत चौकशी सुरू आहे. या खरेदीत भ्रष्टाचार झालाच, शिवाय लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना ही खरेदी झाल्यामुळे या खरेदीची त्या अनुषंगानेही चौकशी सुरू आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंडय़ांची खरेदी असा विषयच मंडळापुढे नव्हता, ही बाब आता नव्याने समोर आली आहे.
काय ठरले होते..?
मुळात मंडळातील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना बागकामाचे शिक्षण द्यावे, त्यांना निसर्गाची ओळख करून द्यावी आणि हे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी नंतर आपापल्या शाळेतील बाग फुलवावी, अशी ही योजना होती. मंडळाचे सदस्य शिरीष फडतरे यांनी तसा प्रस्ताव दिला होता. महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे या विद्यार्थ्यांना बागाकामाचे प्रशिक्षण दिले जाणार होते. अशा प्रकारे प्रत्येक शाळेत छोटीशी बाग फुलवण्यासाठी झाऱ्या, पाण्यासाठी नळी, काही कुंडय़ा व अन्य अवजारे लागतील व त्यांची खरेदी आवश्यकतेनुसार करता येईल अशी चर्चाही या विषयावर झाली होती. ज्या विद्यार्थ्यांना या विषयात गोडी उत्पन्न होईल ते विद्यार्थी भविष्यात या कामाकडे वळतील, अशीही अपेक्षा होती.
आणि झाले काय..?
या मूळ योजनेचा प्रस्तावच मंडळात गायब झाला आणि त्यासाठी निविदाही मागवण्यात आली नाही. दरम्यान, लोकसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरू असताना मंडळाच्या अध्यक्षांनी व शिक्षण प्रमुखांनी सर्व मुख्याध्यापकांना त्यांच्या शाळेसाठी कुंडय़ा खरेदी करण्याचे लेखी आदेश परस्पर दिले. तसा कोणताही ठराव मंडळाने केला नव्हता. प्रत्यक्षात मात्र एका ठेकेदार कंपनीकडून एक हजार रुपयांना एक याप्रमाणे प्रत्येक शाळेने तीन हजार रुपयांच्या तीन कुंडय़ा खरेदी केल्या. कुंडय़ा कोणत्या ठेकेदाराकडून घ्यायच्या, त्याला तीन हजार रुपये प्रत्येक मुख्याध्यापकाने कशा प्रकारे द्यायचे याचेही आदेश देण्यात आले होते. त्यामुळे मुख्याध्यापकांना त्या आदेशाचे पालन करावे लागले आणि शाळाशाळांमध्ये तीन-तीन हजारांच्या कुंडय़ा पोहोचल्या.
मंडळातील विद्यार्थ्यांना बागकाम प्रशिक्षण द्यावे व त्यासाठी जे साहित्य आवश्यक असेल त्याच्या खरेदीची निविदा प्रक्रिया करावी, असा माझा मूळ ठराव होता. त्याचे काहीच झाले नाही. उलट, परस्पर मनमानी पद्धतीने निविदा न मागवता एक हजार रुपयांना एक याप्रमाणे शेकडो कुंडय़ा मात्र खरेदी केल्या गेल्या.
शिरीष फडतरे
सदस्य, महापालिका शिक्षण मंडळ