शेकडो कोटी रुपये खर्च करून बांधलेली शहरातील रुग्णालये महापालिकेला चालवता येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रुग्णालयांच्या या तयार इमारतींमध्ये राज्य शासनाच्या मदतीने तरी आता रुग्णालये चालवता येतील का, असा विचार महापालिका प्रशासन आता करणार आहे. आमची रुग्णालये चालवायला घ्या, असा प्रस्ताव आता महापालिकेकडून राज्य शासनाला पाठवला जाणार असून तसा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.
खराडी आणि बोपोडी येथे नव्याने बांधलेली महापालिकेची दोन रुग्णालये खासगीकरणाने चालवण्यास देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला होता. मात्र, रुग्णालये खासगीकरणाने चालवण्यास देऊ नयेत, असा महत्त्वपूर्ण व धोरणात्मक निर्णय समितीने घेतल्याची माहिती अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांनी दिली. खासगीकरणाच्या या प्रस्तावावर जोरदार चर्चा झाली. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी खासगीकरणाऐवजी ही रुग्णालये योग्य प्रकारे चालतील यासाठी काय करणार त्याचा खुलासा करा, अशी मागणी या चर्चेत केली. नागरिकांना चांगल्या प्रकारची आरोग्यसेवा देण्यासाठी जर रुग्णालये बांधली जात असतील, तर ती चालवण्यासंबंधीची जबाबदारीही महापालिकेचीच आहे, याकडेही लक्ष वेधण्यात आले. मात्र, बांधून तयार असलेली तसेच नव्याने बांधकाम सुरू असलेली रुग्णालये चालवण्यासाठी महापालिका सक्षम नाही, असेही या चर्चेत स्पष्ट झाले.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाला महापालिकेने प्रस्ताव पाठवावा व त्यांच्या साहाय्याने ही रुग्णालये चालवता येतील, याबाबतचे धोरण ठरवावे अशीही चर्चा बैठकीत झाली. त्यानुसार शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाईल, असे निवेदन आयुक्तांनी केले.