कोणत्याही सरकारी मदतीशिवाय सिंहगड पायथ्यालगतच्या १४ गावांना विनामूल्य आणि उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या रुग्णालयाला पक्का रस्ता करून द्यावा, यासाठी लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणांकडे खेटे घातल्यानंतर आणि अर्ज-विनंत्या केल्यानंतर साधा एक किलोमीटर लांबीचा पक्का रस्ता जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना अद्याप करता आलेला नाही. त्यामुळे हे रुग्णालय बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. ‘आपलं घर’ या संस्थेने तसा निर्णय घेतला असून सिंहगड पायथ्यालगतच्या गावांना त्यामुळे आरोग्य सेवेला मुकावे लागण्याची शक्यता आहे.

स्व. वैभव फळणीकर मेमोरिअल फाउंडेशनच्या ‘आपलं घर’ संस्थेकडून सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी डोणजे-गोळेवाडी भागात ‘श्रीमती कौसल्या कराड ग्रामीण रुग्णालय’ सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून अतिदुर्गम भागासाठी फिरत्या दवाखान्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून कोणत्याही सरकारी मदतीशिवाय हा उपक्रम गेल्या कित्येक वर्षांपासून समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने सुरू आहे. गोळेवाडीपासून एक किलोमीटर अंतरावर हे सुसज्ज रुग्णालय आहे. या रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची मात्र अक्षरक्ष: चाळण झाली आहे. रुग्णालयात उपचारांसाठी येणारे रुग्ण रस्त्यावर टाकण्यात आलेल्या खडीमुळे पडून जखमी होत आहेत, तर वैद्यकीय सेवेची तत्काळ गरज असलेल्या रुग्णांपर्यंत रुग्णवाहिका पोहोचण्यातही अडथळे येत आहेत. त्यामुळे रुग्णालयाकडे जाण्यासाठी पक्का रस्ता करावा, अशी मागणी आपलं घर आणि स्व. वैभव फळणीकर फाउंडेशनचे अध्यक्ष विजय फळणीकर यांनी जिल्हा परिषदेकडे केली होती. संस्थेतर्फे गेल्या पंधरवडय़ात आयोजित एका कार्यक्रमासाठी आलेल्या लोकप्रतिनिधींकडेही त्यांनी ही मागणी केली होती. गेल्या सहा वर्षांपासून त्यासाठी ते लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणांकडे सातत्याने अर्ज-विनंत्या करीत आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून, आमदार निधीतून तसेच ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन त्यांना सातत्याने देण्यात आले. मात्र गेल्या आठवडय़ात झालेल्या अपघातामुळे त्यांनी सुसज्ज रुग्णालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रीमती कौसल्या कराड ग्रामीण रुग्णालयात २१ मार्च रोजी एक मजूर महिला तिच्या चार वर्षांच्या मुलीसह उपचारांसाठी येत असताना महिलेच्या हातातून मुलगी खाली पडली आणि ती गंभीर जखमी झाली. या अपघातात मुलीच्या डोक्याला टाके घालावे लागले. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मुलीवर त्वरित वैद्यकीय उपचार केले. मात्र या अपघातामुळे व्यथित होऊन रुग्णालयच बंद करण्याचा निर्णय फळणीकर यांनी घेतला आहे. या संदर्भातील निवेदनही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी दिले.

यंत्रणा दखल कधी घेणार?

आपलं घर संस्थेच्या वतीने निराधार मुला-मुलींसाठी वास्तूची उभारणी करण्यात आली आहे. या नूतन वास्तूचा उद्घाटन कार्यक्रम ११ मार्च रोजी झाला होता. त्यावेळी फळणीकर आणि संस्थेचे पदाधिकारी तसेच मुलांनी पक्का रस्ता करण्याची मागणी केली होती. या संदर्भात सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची माहितीही त्यांनी दिली होती. रस्त्याअभावी रुग्णवाहिका वेळेत पोहोचत नसल्यामुळे चालकाला मारहाणीच्या घटना झाल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे आता तरी लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणा याची दखल घेणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दिवंगत मुलाच्या स्मृतीसाठी हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यात आले होते. मात्र पक्का रस्ता नसल्यामुळे आता रुग्णालय बंद करण्याचा दुर्दैवी निर्णय आमच्या ट्रस्टला घ्यावा लागत आहे.

– विजय फळणीकर, अध्यक्ष, स्व. वैभव फळणीकर मेमोरिअल फाउंडेशन