24 February 2021

News Flash

..आणि कार्यक्षमतेचे कौतुकही

निगडी आगाराचे व्यवस्थापक सतीश माटे, हडपसरचे व्यवस्थापक विक्रम शितोळे आणि कात्रजचे व्यवस्थापक नितीन घोगरे यांचा सत्कार डॉ. परदेशी यांनी केला.

| February 21, 2015 03:20 am

पुणे आणि पिंपरीत सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा देण्यासाठी पीएमपीमध्ये जे जे चांगले उपक्रम व योजना राबवणे शक्य आहे ते सर्व उपक्रम वा योजना जाहीर केल्याप्रमाणे राबवल्या जात असल्याचा अनुभव अधिकाऱ्यांना शुक्रवारी आला. कामात हलगर्जीपणा दाखवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच चांगले काम करणाऱ्यांचीही माहिती सर्वाना दिली जाईल. असे डॉ. श्रीकर परदेशी यांनी जाहीर केले होते. त्यानुसार तीन आगार व्यवस्थापकांचा सत्कार करून डॉ. परदेशी यांनी सर्वाना प्रोत्साहन दिले.
पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक या पदावर काम सुरू केल्यानंतर डॉ. परदेशी यांनी लगेचच पीएमपीच्या अधिकाधिक गाडय़ा मार्गावर आणण्यासाठी तसेच उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसत असून, पीएमपीच्या ताफ्यातील शेकडो बंद गाडय़ा आता मार्गावर आल्या आहेत. सुटे भाग उपलब्ध होत नसल्याचे कारण नेहमी सांगितले जात असे. तसेच सुटे भाग खरेदीसाठी निधी नसल्याचे कारण सांगितले जात असे. त्यावरही उपाय शोधण्यात आला असून, सुटे भाग खरेदीसाठी पीएमपीच्या दैनंदिन उत्पन्नातील सहा टक्के भाग उपलब्ध करून दिला जात आहे.
अधिकाधिक गाडय़ा मार्गावर आणण्यासाठी कोणकोणत्या आगारांतर्फे कोणते उपाय केले जात आहेत तसेच जास्तीतजास्त गाडय़ा कोणत्या आगाराकडून आणल्या जात आहेत, याची माहिती दर महिन्याला जाहीर केली जाईल, असे डॉ. परदेशी यांनी दोन महिन्यांपूर्वीच सांगितले होते. त्यानुसार जानेवारी महिन्याची सर्व आगारांची कामगिरी जाहीर झाली असून त्यात निगडी आगाराला प्रथम क्रमांक मिळाला आहे. हडपसर डेपोला द्वितीय तर कात्रज डेपोला तृतीय क्रमांक मिळाला आहे. निगडी आगाराने ताफ्यातील एकूण गाडय़ांपैकी ७४ टक्के गाडय़ा मार्गावर आणल्या आणि दैनंदिन उत्पन्न प्रतिबस १२,०२३ रुपये इतके मिळवले. हडपसर डेपोने ७१ टक्के गाडय़ा मार्गावर आणल्या असून दैनंदिन उत्पन्न प्रतिबस १२,०७० रुपये इतके मिळवले आहे. कात्रज आगाराने ६९.२८ टक्के गाडय़ा मार्गावर आणल्या असून, त्याचे प्रतिबसचे दैनंदिन उत्पन्न १२,२१२ रुपये इतके आहे. कात्रज आगाराचे उत्पन्न सर्वाधिक असले, तरी गाडय़ा मार्गावर आणण्यात निगडीने प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे दहा आगारांमध्ये त्या आगाराला प्रथम क्रमांक मिळाला. या कामगिरीबद्दल निगडी आगाराचे व्यवस्थापक सतीश माटे, हडपसरचे व्यवस्थापक विक्रम शितोळे आणि कात्रजचे व्यवस्थापक नितीन घोगरे यांचा सत्कार डॉ. परदेशी यांनी केला. तसेच आगार अभियंता गोपीचंद सावंत, मनोहर पिसाळ आणि विकास जाधव यांचाही सत्कार करण्यात आला.

जेथे चुका होतात तेथे कारवाई झाली पाहिजे. त्याबरोबरच जे अधिकारी, कर्मचारी चांगले काम करतात त्यांचे निश्चितपणे कौतुकही झाले पाहिजे. नेमकी हीच बाब राहून जाते. चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यानुसार दर महिन्याचे सर्व डेपोंचे रँकिंग आम्ही जाहीर करणार आहोत.
डॉ. श्रीकर परदेशी
अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2015 3:20 am

Web Title: hospitality by dr pardeshi
Next Stories
1 – विनोद दोशी पुरस्कार आणि नाटय़महोत्सव
2 नाटय़संमेलन यशस्वी केलेले बेळगावकर आता सरकारी अनुदानाच्या प्रतीक्षेत
3 इंद्रायणी नदीचे प्रदूषण पिंपरी पालिकेमुळेच – स्थायी समिती अध्यक्ष
Just Now!
X