|| चिन्मय पाटणकर

शांत-निवांत वातावरण असल्याने खवय्यांचीही पसंती; दगडी बांधकाम असलेल्या जुन्या बंगल्यांचा वापर

विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक शहर याबरोबर दगडी बांधकाम असलेले जुने बंगले ही पुण्याची वेगळी ओळख. मात्र, गेल्या काही काळात या जुन्या बंगल्यांमध्ये हॉटेल सुरू करण्याचा नवा कल पाहायला मिळत आहे. शांत-निवांत वातावरण असलेल्या या बंगल्यांमधील हॉटेल्सना खवय्यांकडूनही चांगलीच पसंती मिळत आहे.

पुण्यातील मध्यवर्ती भागात अनेक जुने बंगले आहेत. त्यातील अनेक बंगले आज बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या बंगल्यांमध्ये व्यवसाय सुरू करण्याकडे अनेकांचा कल असल्याचे दिसून येत आहे. जुन्या बंगल्याची वास्तू तशीच ठेवून त्याची थोडी डागडुजी करून, त्याला आकर्षक नाव देऊन हॉटेलच्या रुपात सादर केले जात आहे. जंगली महाराज रस्त्यावरील सुभद्रा, चायना टाऊन ही बंगल्यांमधील हॉटेल्सची दोन जुनी उदाहरणे सांगता येतील. त्याशिवाय अलीकडच्या काळात बंगल्यात हॉटेल सुरू करण्याचा कल नव्याने विकसित झाला आहे. डेक्कन परिसरात ग्रीन सिग्नल, टेबल टॉक अशी नवीन हॉटेल्स, रेस्तराँ सुरू झाली आहेत. तसेच कॅम्प, कोरेगाव पार्क, सहकारनगर, कोथरूडमध्येही अशीच बंगल्यांतील हॉटेल्स आहेत.

‘हॉटेल सुरू करण्यासाठी आम्ही मोकळे वातावरण असलेल्या जागेच्या शोधात होतो. आपटे रस्त्यावरील बंगल्याच्या रुपाने आम्हाला तशी जागा मिळाली. बंगला पाहिल्यावर खूप चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करता येईल, याची कल्पना आली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आज डेक्कन परिसरात दोन घटका मित्रमंडळींबरोबर किंवा एकटय़ालाही निवांत बसता येईल अशी जागा नाही. जे आहेत ते वातानुकूलित कॅफे आहेत. झाडे, पक्ष्यांचा आवाज असलेली जागाच दुर्मीळ आहे. त्या दृष्टीने आम्ही आमची कल्पना ग्रीन सिग्नलच्या रुपात प्रत्यक्षात आणली,’ असे आपटे रस्त्यावरील ग्रीन सिग्नल हॉटेलचे संचालक रणजित गुगळे यांनी सांगितले.

बंगल्याचे मालक असलेल्या रोहित एकबोटे यांनी स्वतच हॉटेल सुरू केले आहे. त्याविषयी ते म्हणाले, ‘आम्हाला ही जागा विद्यार्थ्यांना ‘कॉट बेसिस’वर वगैरे द्यायची नव्हती. काहीतरी वेगळे करण्याचा विचार होता. त्यातून हॉटेलची कल्पना पुढे आली. बाहेरच्या कॅफेसारखे वातावरण येथे नसल्याने प्रतिसादही चांगला मिळतो. सर्जनशील मंडळींना हवी असलेली शांतता येथे मिळते.’

‘बंगल्यातील हॉटेल म्हणजे एका अर्थाने वेगळ्या प्रकारचा कट्टाच आहे. बाकी हॉटेल्सप्रमाणे येथे गर्दी नसते. थोडा वेळ शांत बसता येते ही फार महत्त्वाची गोष्ट आहे,’ असे ओरिगामी कलाकार संग्राम साधले यांनी सांगितले.

कारणे काय?

बंगल्यात हॉटेल करण्यामागे स्मरणरंजनाची भावना असते. त्यात एक घरगुती आत्मीयता वाटते. पुण्यात असे रिकामे असलेले अनेक बंगले आहेत. त्या बंगल्यात राहण्याएवढे मोठे कुटुंबही आता नसते. मात्र, बंगल्यांच्या मालकांना ती जागा विकायची नसते किंवा त्या बंगल्याच्या जागी पुनर्विकासही करायचा नसतो. अशा वेळी बंगला हॉटेलसाठी दिला जातो. त्या निमित्ताने त्या जागेची देखभाल होते आणि उत्पन्नही मिळते.