लॉकडाउनमुळे अनेक उद्योगांबरोबर हॉटेल व्यवसायिकांना देखील मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. गेल्या चार महिन्यात पिंपरी-चिंचवड, आळंदी, चाकण आणि तळेगाव या परिसरातील हॉटेल्स बंद असल्याने त्यांचे तब्बल ६० कोटींचे नुकसान झाले असून १ लाख कामगार बेरोजगार झाले आहेत, अशी माहिती हॉटेल संघटनेचे अध्यक्ष पद्मनाभन शेट्टी यांनी दिली. पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात ४ हजार हॉटेल्स आहेत.

सध्या लॉकडाउनचे नियम शिथील करून पार्सलला परवानगी देण्यात आली आहे. परंतु, याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली असल्याचे हॉटेल व्यवसायिक सांगतात. मार्च महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उपाययोजना म्हणून राज्य आणि केंद्र सरकारने लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, त्यानंतर लॉकडाउनचे टप्पे वाढतच गेले याचा थेट फटका हॉटेल व्यवसायिक आणि इतर उद्योगांना झाला.

हॉटेल संघटनेचे अध्यक्ष शेट्टी म्हणाले, “चार महिन्यात हॉटेल व्यवसायकांचे सुमारे ६० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ९० टक्के कामगार गावी गेले आहेत तर अनेक जण बेरोजगार झाले आहेत. १ लाख कामगारांना सध्या नोकरी नाही. शहर आणि परिसरात ४ हजार हॉटेल आहेत. हॉटेल्समध्ये काम करणारे कामगार हे उत्तराखंड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, कोल्हापूर येथील आहेत. हे सर्व कामगार आता त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. सर्व हॉटेल मालकांची सध्याची स्थिती बिकट झाली आहे.

जेवणाचे दर वाढणार नाहीत

शासनाच्या नियमानुसार ५० टक्के हॉटेल्स सुरू होतील. मात्र, त्यामुळे व्हेज आणि नॉनव्हेज जेवणाचे दर वाढणार नसल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले. लॉकडाउनमुळे नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, पैसे नाहीत त्यामुळे दर वाढवण्याचा विचार नाही असे त्यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारने हॉटेल्स चालक आणि मालकांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

…अन्यथा आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल

हॉटेलमधून ग्राहकांना पार्सल दिले जात आहे. परंतु, म्हणावा तसा प्रतिसाद ग्राहकांकडून मिळत नाही. हॉटेलमधील कामगारांना लॉकडाउनमध्ये बसून पगार दिला जात आहे. परिस्थिती खूप बिकट आहे. सरकारला एकच मागणी आहे की आम्ही नियमांचे पालन करू मात्र, हॉटेल्स उघडण्यासाठी परवानगी द्यावी. नाहीतर आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल. कुटुंबाच्या गरजा आम्ही पूर्ण करू शकत नसल्याचे हॉटेल मालक शंकर चक्रवर्ती यांनी सांगितले.