शहरातील मोठय़ा अतिक्रमणांवर महापालिकेने धडक कारवाई सुरू केली असून या कारवाई अंतर्गत मंगळवारी गणेशखिंड रस्त्यावरील हॉटेल प्राइडमध्ये करण्यात आलेले बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात आले. या कारवाईत हॉटेलचे १४ हजार ३५० चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले असून समोर घालण्यात आलेल्या शेड तसेच तळघरात करण्यात आलेल्या बांधकामाचा समावेश आहे.
महापालिकेच्या बांधकाम विकास विभागातर्फे ही कारवाई सुरू करण्यात आली असून कारवाईची माहिती उपायुक्त माधव जगताप यांनी दिली. इमारत निरीक्षक संजय मोहिते आणि विनायक शिंदे यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. गणेशखिंड रस्त्यावरील समोरील बाजूस साडेपाच हजार चौरस फुटांच्या शेडचे बांधकाम करण्यात आले होते. हे बांधकाम व्यवस्थापनाने स्वत:हून उतरवून घेतले. तसेच पहिल्या मजल्यावरील पाच हजार चौरस फुटांचे किचनसाठी केलेले बांधकामही व्यवस्थापनाने काढून घेतले. त्याबरोबरच महापालिकेच्या सेवकांनी पत्र्याच्या तीन शेड पाडल्या. तसेच तळघरात बांधलेले कार्यालयही पाडण्यात आले. या कारवाई अंतर्गत १४ हजार ३५० चौरस फुटांचे बांधकाम पाडण्यात आले.