पार्सल भोजनाला पुणेकरांची मर्यादित पसंती

पुणे : सकस भोजन आणि चमचमीत मिसळ यांसारखे पदार्थ पार्सल स्वरूपात मिळत असले तरी सध्याच्या वातावरणात त्याला पुणेकरांची मर्यादित पसंती लाभत आहे. त्यामुळे कुरियर कंपनीच्या मदतीने नागरिकांना घरपोच सेवा देण्यासाठी हॉटेलचालक सज्ज झाले आहेत.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे शहरातील हॉटेल्स गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहेत. त्याचा परिणाम मासिक तत्त्वावर बाहेर भोजन करणाऱ्या नागरिकांवर झाला आहे.

आता टाळेबंदीतून काही प्रमाणात सवलत मिळाल्यानंतर काही मोजकी हॉटेल्स सुरू झाली असली, तरी गर्दी टाळण्याच्या उद्देशातून केवळ पार्सल स्वरूपात अन्नपदार्थ दिले जात आहेत. हॉटेल श्रेयस, पूना बोर्डिग हाउस आणि आबाचा ढाबा यांनी भोजन देण्यास तर बेडेकर मिसळ हाउसने मिसळ पार्सल स्वरूपात देण्यास सुरुवात केली आहे. या सर्व ठिकाणी सकाळी आगाऊ नोंदणी करावी लागते.

मात्र, शहराच्या मध्य भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद मर्यादित स्वरूपातच आहे. त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद वाढविण्यासाठी हॉटेलचालकांनी एकत्र येऊन कुरियर कंपनीच्या मदतीने घरपोच सेवा देण्याचे ठरविले आहे.

ज्यांना घरी स्वयंपाक करणे शक्य होत नाही, घरामध्ये एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक असेच प्रामुख्याने आमचे ग्राहक आहेत. ज्यांना पूर्ण भोजन नको असेल त्यांच्यासाठी पोळी-भाजी किंवा भाजी-आमटी देखील पार्सल स्वरूपात दिली जाते. सायंकाळी सातनंतर वाहतुकीचे  र्निबध असल्यामुळे सध्या केवळ दुपारी भोजन दिले जात आहे., असे पूना बोर्डिग हाउसचे सुहास उडपीकर यांनी सांगितले.

बेडेकर मिसळ हाउस सध्या सकाळी दहा ते बारा या वेळातच ग्राहकांना मिसळ पार्सल देण्यासाठी खुले आहे. आगाऊ नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना डबे आणू नयेत असे सांगितले जाते. आम्हीच मिसळ पार्सल करून देतो. मिसळीचा दर तोच असला तरी पार्सलसाठीच्या सामग्रीमुळे किमतीमध्ये थोडी वाढ झाली आहे, असे अनिल बेडेकर यांनी सांगितले.