महाविद्यालयांमधील नियमित शिक्षकांचे वेतन सहाव्या वेतन आयोगानंतर लाखाच्या घरात गेले असले, तरी तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या महाविद्यालयीन शिक्षकांना मात्र अजूनही वेतनासाठी झगडावे लागत आहे. तासिका तत्त्वावरील शिक्षकांना वेळेवर वेतन मिळावे, अशी मागणी प्राध्यापक संघटनांकडून केली जात आहे.
प्राध्यापकांच्या नियमित जागा भरण्यासाठी मान्यता न मिळाल्यामुळे, काही विषयांसाठी पूर्णवेळ प्राध्यापक नियुक्त करण्यासाठी मान्यता न मिळाल्यामुळे अशी अनेक कारणे पुढे करत महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर शिक्षक घेतले जातात. पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना तासाला साधारण ३०० ते ५०० रुपये मानधन मिळते. हे मानधन दरमहा मिळत नसून सहा महिन्यांनी किंवा वर्षांने दिले जाते. मिळणारे मानधन किमान वेळेवर मिळावे अशी मागणी शिक्षकांकडून केली जात आहे. शासनाकडून मानधन आले की आम्ही देतो असे उत्तर महाविद्यालयांकडून दिले जाते. मात्र, महाविद्यालये सहा महिन्यांचे किंवा एक वर्षांचे मानधनाचे प्रस्ताव एकत्र करून पाठवतात. महाविद्यालयांनी प्रस्ताव पाठवल्यानंतरच आम्ही मानधन देऊ शकतो, असे उच्च शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.
याबाबत पुणे युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. हेमलता मोरे यांनी सांगितले, ‘‘तासिका तत्त्वावरील शिक्षक हे पात्रतेचे निकष पूर्ण करणारे असावेत, त्यांची नियुक्ती रितसर जाहिरात देऊन केली जावी, असे नियम आहेत. मात्र, काही शिक्षणसंस्था या शिक्षकांची नियुक्ती नियमानुसार करत नाहीत, या शिक्षकांच्या वेतनाबाबत सर्वाधिकार मग शिक्षणसंस्थांकडे राहतात. तासिका तत्त्वावरील शिक्षकांना ठरलेले वेतन अनेकवेळा मिळत नाही, ते वेळेवर मिळत नाही. याबाबत संघटनेने बहिष्काराच्या कालावधीमध्ये उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची परिस्थिती मांडण्यात आली होती. मात्र, त्यावर आश्वासन मिळूनही पुढे काही कार्यवाही झाली नाही.’’