सदाशिव पेठेमधील एका घराचे कुलूप तोडून सोने व चांदीचे दागिने मिळून एक लाख ६० हजारांचा ऐवज चोरून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी चोवीस तासांतच गजाआड पाठविले. या प्रकरणात पकडलेला हा आरोपी सराईत गुन्हागार असून, त्याचा इतरही गुन्ह्य़ात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शंकर प्रल्हाद निकम (वय २५, रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी कृष्णाजी चंद्रकांत देवधर (वय ५७, रा. जिज्ञासा क्लाससमोर, सदाशिव पेठ, पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. देवधर हे ३१ ऑगस्टला कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. या कालावधीत त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरटय़ांनी आठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीची भांडी व रोख रक्कम मिळून १ लाख ६८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. घटनेनंतर वरिष्ठांनी घटनास्थळाला भेट देऊन तातडीने तपास सुरू केला होता.
पोलीस कर्मचारी अशोक माने व विशाल शिंदे यांना खबऱ्यांमार्फत या घरफोडीतील आरोपीची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कासेवाडी भागामध्ये सापळा लावून निकम याला पकडले. सुरुवातीला त्याने माहिती देण्यास टाळाटाळ केली. मात्र, नंतर त्याने एका साथीदाराच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. चोरलेले सोने व रोख रक्कम त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे. निकम याने यापूर्वी चोरी व घरफोडीचे तीन, तर गंभीर दुखापतीचा एक गुन्हा केला आहे. घरफोडीच्या गुन्ह्य़ातील त्याचा साथीदार फरार झाला आहे. निकम याला न्यायालयाने ४ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.