पर्यावरणपूरक प्रकल्प राबवण्याचे नियोजन करत काटेकारे अंमलबजावणी

शहर स्वच्छतेबाबत शासकीय यंत्रणांकडून सातत्याने जनजागृती होत असताना सोसायटय़ा किंवा गृहनिर्माण संस्थांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याच्या, तेथे कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण होत नसल्याच्या आणि प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीकडे योग्य लक्ष देण्यात येत नसल्याच्या तक्रारी सातत्याने होतात.  मात्र शहरातील अनेक सोसायटय़ा आणि गृहनिर्माण संस्था त्याला अपवाद ठरल्या आहेत. त्यामुळेच सोसायटय़ांमधील सदस्यांनी स्वच्छतेची आवश्यकता ओळखून पर्यावरणपूरक प्रकल्प राबविण्याचे नियोजन करत त्याची काटेकोर अंमलबजावणी केली आणि त्यांची ही कृती बक्षीसपात्र ठरली.

अपारंपरिक ऊर्जेचा वापर, गांडूळखत प्रकल्प, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण (रेन वॉटर हार्वेस्टिंग), सांडपाण्याचा पुनर्वापर करणाऱ्या या सोसायटय़ांना महापालिकेच्या वतीने आयोजित स्वच्छता स्पर्धेत यश मिळाले आहे.  शहराचा विस्तार चोहोबाजूने झपाटय़ाने होत असताना मोठय़ा प्रमाणावर बांधकामे उभी राहात आहेत. त्यामुळे कचऱ्याची तीव्र समस्या लक्षात घेऊन सोसायटय़ांनी त्यांचा कचरा सोसायटय़ांमध्येच जिरवावा, पर्यावरणपूरक प्रकल्प राबवावेत, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले होते. विविध प्रकल्प राबविणाऱ्या सोसायटय़ांना मिळकत करामध्ये सवलत देण्याचा निर्णयही त्यासाठी घेण्यात आला. सध्या शहरातील काही सोसायटय़ांकडून विविध प्रकल्प उभारण्यात आले आहेत. मात्र त्यांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्हच आहे. या पाश्र्वभूमीवर स्वच्छता स्पर्धेत सहभागी झालेल्या मुळशी रस्ता बावधन येथील  ग्लोरिया हाऊसिंग सोसायटी, व्यंकटेश लेकव्हिस्टा-सिद्धीविनायक हाउसिंग सोसायटी, पाषाण रस्त्यावरील डीएसके-रानवारा, बावधन येथील अ‍ॅम्बिएन्स अ‍ॅँटिलिया आणि प्रभात रस्त्यावरील सानिकेत हाऊसिंग या सोसायटय़ांनी अन्य गृहनिर्माण प्रकल्पांपुढे नवा आदर्श ठेवला आहे. स्पर्धेतील विजेत्या सोसायटय़ांच्या प्रतिनिधींशी ‘लोकसत्ता’ने संवाद साधल्यानंतर शहर स्वच्छता, कचरा समस्या आणि अपारंपरिक ऊर्जेबाबतचा त्यांचा सजग दृष्टिकोनही अधोरेखित झाला.

ग्लोरिया हौसिंग ही साडेचारशे सदनिका असलेली सोसायटी आहे. त्यामुळे सदनिकाधारकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करावे यासाठी पुढाकार घेण्यात आला. त्यानुसार ओला आणि सुका कचरा वर्गीकरणात कोणते घटक येतात याची यादी सदस्यांना देण्यात आली.

प्रथम या गोष्टीवर काम करणे काहीसे कठीण ठरले, पण सवय झाल्यानंतर त्याचे काटेकोर पालन झाले. त्यामुळे सोसायटीच्या कचऱ्यापासून तयार झालेले खत बागेसाठी वापरण्यात येत आहे. याशिवाय सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्यात येत असून वाहनतळामधील विद्युत व्यवस्था आणि जिन्यांमध्ये सौर ऊर्जेपासून तयार केलेल्या विजेचा वापर होतो, अशी माहिती ग्लोरिया हौसिंगचे अध्यक्ष मंगेश बोरसे यांनी दिली.

व्यंकटेश लेकव्हिस्टाचे सुशील सपकाळ म्हणाले, पावसाचे पाणी वाया जाण्याचा प्रकार घडतो. त्यामुळे पाणी पुनर्वापर करण्यावर सोसायटीकडून लक्ष केंद्रित करण्यात आले. सोसायटीमधील बागकामासाठी हे पाणी वापरण्यात येत आहे. ई-वेस्टची गंभीर समस्या लक्षात घेऊन त्यासंदर्भात जनजागृती मोहीमही सोसायटीच्या सदस्यांकडून राबविण्यात येत आहे. सुका कचरा पुनर्वापर करण्यासाठी काही संस्थांना दिला जातो. प्रकल्पातून तयार झालेले खत शेतकऱ्यांना दिले जाते. गेल्या चार वर्षांपासून अखंडितपणे हा उपक्रम सुरु आहे.

सोसायटय़ांमधून भविष्याची गरज लक्षात घेऊन अनेक उपाययोजना राबविण्यात येत असल्यामुळे या सोसायटय़ा नवा आदर्श ठरल्या आहेत.