सोसायटय़ांचा विरोध डावलून घाईने निर्णय

पुणे : कोथरूडमधील काही सोसायटय़ांना असणारा प्रवेश मार्ग अरूंद असल्यामुळे रस्ता रूंदीकरण करण्याचा घाट महापालिकेने घातला आहे. त्यामुळे अस्तित्वातील ६ मीटर रुंदीचा रस्ता ९ मीटर रुंद करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे लगतच्या चार सोसायटय़ांनी रस्ता रुंदी नको, अशी लेखी हरकत घेतलेली असतानाही विरोध डावलून हा निर्णय घेतला जात आहे. या रस्तारुंदीकरणामुळे लगतच्या सोसायटय़ांच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात असला तरी बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठीच हा निर्णय घेतला गेल्याचेही स्पष्ट होत आहे.

कोथरूड येथील सर्वेक्षण क्रमांक १५/४ आणि १६/१४ सिटी सर्वेक्षण क्रमांक ६८१, ६८२ येथील सोसायटय़ांना असणारा प्रवेशमार्ग अरूंद असल्यामुळे वालचंद हाऊसपासून आतील सोसायटय़ांपर्यंत असणारा ६ मीटर रुंदीचा रस्ता ९ मीटर करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला अवंतिका को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, वालचंद इंडस्ट्रीज लिमिटेड, फौउंटनहेड अपार्टमेंट आणि चिनार को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड यांनी हरकत नोंदविली होती. त्यावर महापालिके ने पथ विभाग, बांधकाम विकास विभाग आणि वाहतूक नियोजन विभागाकडून अभिप्राय मागविला होता. या तिन्ही विभागांनी रस्ता रुंदीकरण करण्यास हरकत नसल्याचे कळविले होते.

महापालिके च्या या निर्णयाविरोधात सोसायटय़ांनी लेखी हरकती नोंदविल्या होत्या. सोसायटीचा पुनर्विकास करताना सोसायटीच्या दक्षिणेकडील बाजू ९ मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी देऊन बांधकाम करण्याचे नियोजित आहे. त्यामुळे सोसायटीचे क्षेत्रफळ दक्षिण बाजूने कमी होणार आहे, असे असताना उत्तर बाजूने क्षेत्र कमी झाल्यास सोसायटीचे नुकसान होईल. सोसायटीमधील पार्किं गसाठी जागा शिल्लक राहणार नाही, रुंदीकरणाच्या प्रस्तावित आराखडय़ातील रस्ता पुढे ५० मीटर अंतरावर संपत आहे. तेथे कोणतीही लोकवस्ती नाही. व्यावसायिक उद्योग, शाळा, बँका, कं पन्या नाहीत. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचा निर्णय योग्य नसून तो स्थानिकांचे नुकसान करणारा आहे, असा आक्षेप अवंतिका को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडने घेतला होता. पूर्व पश्चिम रस्त्यावर फारशी रहदारी नाही. रस्ता रुंदीकरणामुळे सोसायटय़ांच्या पार्किं गचे नुकसान होणार आहे. रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक वाढणार आहे. फौउंटनहेड अपार्टमेंटच्या तिन्ही बाजूंनी रस्ते आहेत. यापूर्वीच बरासचा भाग रस्त्यासाठी गेला आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाची गरज नाही, अशी हरकत फौउंटनहेड अपार्टमेंटकडून घेण्यात आली होती. चिनार को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीनेही विरोध दर्शविला आहे.

विरोधानंतरही प्रस्तावाला मंजुरी

आलेल्या हरकती सूचनांच्या अनुषंगाने मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यामध्येही रस्ता रुंदीची कोणतीही मागणी नाही आणि रस्ता रुंदीकरणाची गरज नाही, असे सोसायटय़ांच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले. मात्र त्यानंतरही सोसायटय़ांच्या पुनर्विकासाच्या नावाखाली रस्ता रुंदीकरणाचा घाट महापालिके ने घातला आहे. प्रवेश मार्ग ६ मीटर रुंदीवरून ९ मीटर रुंदीचा करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये दाखल मान्य करून घेण्यात आला आहे. त्यामुळे पुनर्विकासाच्या नावाखाली काही बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोपही होत आहे.