अलीकडे फिर्यादी, साक्षीदार फितूर होण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषत: लातूर, बीडमध्ये त्याचे प्रमाण खूपच आहे. मात्र, करणार काय, त्यासाठी यंत्रणेत सुधारणा हवी. मात्र, प्रत्येक गोष्टीला पोलिसांना जबाबदार धरले जाते, ते का, असा मुद्दा सीआयडीचे उपमहानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी चिंचवड येथे उपस्थित केला. पोलिसांना निलंबित करण्याच्या कारवाईचे प्रमाणही खूप मोठे आहे. निलंबनाची कारवाई होत नाही, असे एकही अधिवेशन होत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पिंपरी पालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या वतीने वैद्यकीय व्यवसायातील कायदेशीर बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन मुत्याल यांच्या हस्ते झाले, त्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश विलास बांबर्डे, पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी, विरोधी पक्षनेते कैलास कदम, प्रभाग अध्यक्ष जावेद शेख, सुरेखा गव्हाणे, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम गायकवाड, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, संयोजक प्रकाश रोकडे, एम. व्ही. सोनवणे आदींसह राज्यभरातील डॉक्टर प्रतिनिधी उपस्थित होते.
मुत्याल म्हणाले, पोस्टमार्टेम करणे हे मोठे जबाबदारीचे काम असून पोस्टमार्टेमची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे, या कामासाठी पूर्ण वेळ दिला गेला पाहिजे, तेथे चुकांना संधी नाही. अनेकदा काही जखमा दुर्लक्षित राहतात. बारकाईने व नियमानुसार काम व्हावे, प्रत्येक गोष्ट नमूद व्हावी, काम टाळणे चुकीचे आहे. पोलीस काही तज्ञ नसतात, ते तज्ञांची मदत घेऊन काम करत असतात. दुसऱ्याला न्याय द्यायचा असेल व स्वत: अडचणीत यायचे नसेल तर चुका होता कामा नयेत, आतापर्यंत अनेक पोलीस व डॉक्टरांनाही शिक्षा झाल्या आहेत. आपणही लॉकअप किंवा जेलमध्ये जाऊ शकतो, हे लक्षात ठेवून खबरदारी बाळगा. आता माहितीचा अधिकार आल्याने काम करणे अवघड झाले आहे. विशेषत: २००५ नंतर अडचणी वाढल्या आहेत. असे ते म्हणाले.