डिसेंबर-जानेवारीत ऊसतोडणीसाठी येणाऱ्या मजुरांना उघडय़ावर राहावे व झोपावे लागत असल्यामुळे त्यांना असलेला बिबटय़ांच्या हल्ल्यांचा धोका टाळण्यासाठी आवश्यक सुविधा पुरवण्याबाबत साखर कारखान्यांशी चर्चा सुरू आहे.
मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी ही माहिती दिली. ‘उघडय़ावर प्रातर्विधीसाठी जावे लागणाऱ्यांवर बिबटय़ांचे हल्ले होण्याचे प्रकार टाळणे आवश्यक आहे. यासाठी स्वच्छतागृहांची सोय करणे गरजेचे असून, ऊसतोडणी कामगारांच्या लहान मुलांना बाहेर खेळताना सुरक्षितता मिळणेही आवश्यक आहे. ऊसतोडणी मजुरांसाठी या सोयी पुरवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व साखर कारखान्यांशी बोलणी केली आहेत,’ असे त्यांनी सांगितले.
जुन्नर व परिसरातील बिबटय़ांच्या हल्ल्यांच्या काही घटनांच्या पाश्र्वभूमीवर पुण्यात बिबटय़ाचा वावर असलेल्या ठिकाणी असलेला मानव-बिबटय़ा संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागातर्फे समिती नेमण्यात आली होती. या समितीने ऑगस्टमध्ये आपला अहवालही सादर केला होता. दीर्घकालीन उपायांबरोबरच बिबटय़ांच्या हल्ल्यांपासून नागरिकांसह पाळीव पशूंचेही संरक्षण व्हावे यासाठी काही उपाय तातडीने योजले जाणार असल्याचे लिमये यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘जिल्हाधिकारी आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी स्तरावर काही उपाय लगेच सुरू करता येण्याजोगे आहेत. मानवी वस्तीच्या आसपास शेतात सापडलेले बिबटे अनेकदा विहिरीत पडल्याचे दिसून येते. कोणत्या गावात बिबटय़ांचा वावर दिसतो, तिथल्या विहिरींची संख्या काय याविषयीची माहिती पुरवण्यात येत असून, विहिरींना कठडे बांधण्याचे काम जिल्हास्तरावर होईल. दगडविटांचे कठडे बांधण्यासाठी अधिक खर्च अधिक येतो, परंतु साधे कमी खर्चिक कुंपण घालूनही हवा तो फायदा मिळतो. जनावरांवरील हल्ले रोखण्यासाठी गोठय़ांना जाळी बसवणे हा उपायही तातडीने करायचा आहे.’