• बारावीची परीक्षा आजपासून सुरू, वेळेनंतर प्रवेशास मनाई
  • राज्यातून पंधरा लाख परीक्षार्थ्यांच्या मेहनतीची कसोटी
  • प्रश्नपत्रिकाफुटी टाळण्यासाठी भरारी पथकांची मदत
  • मंडळाकडून लाखबंद पाकिटांचा उपाय

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची परीक्षा बुधवारपासून (२१ फेब्रुवारी) सुरू होत असून प्रश्नपत्रिका फुटण्यापासून ते व्हॉट्स अ‍ॅप सारख्या समाजमाध्यमावरून ती व्हायरल होण्यापर्यंत गेल्या काही वर्षांत घडलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय राज्य मंडळाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षेच्या वेळेपूर्वीच विद्यार्थ्यांनी वर्गात पोहोचावे, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत परीक्षेच्या तयारीची माहिती दिली. गेल्या तीन ते चार वर्षांपासून दरवर्षी राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल होत असल्याने आता मंडळाकडून लाखबंद (सील) पाकिटांचा उपाय शोधण्यात आला आहे. या नव्या नियमानुसार आता पर्यवेक्षकांना २५ विद्यार्थ्यांसाठीच्या प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा असलेले लाखबंद पाकिट देण्यात येणार असून पर्यवेक्षक त्या वर्गात गेल्यानंतर तेथील दोन विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेऊन मगच ते  पाकिट फोडायचे आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकाफुटीचा धोका यंदापासून टळेल अशी आशा आहे.

या परीक्षेत विज्ञान शाखेच्या पाच लाख ८२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे तर कला शाखेच्या चार लाख ७९ हजार ८६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. वाणिज्यच्या तीन लाख ६६ हजार ७५६, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ५७ हजार ६९३ अशा एकूण १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास राज्य मंडळाच्या ०२०-२५७०५२७१, २५७०५२७१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांसाठी विभागवार हेल्पलाइन क्रमांक

  • पुणे – (०२०) ६५२९२३१७
  • नागपूर – (०७१२) ५६५४०३, २५५३४०१, २५६०२०९
  • औरंगाबाद – (०२४०) २३३४२२८, २३३४२८४
  • मुंबई – (०२२) २७८८१९७५, २७८९३७५६
  • कोल्हापूर – (०२३१) २६९६१०१, ०२, ०३
  • अमरावती – (०७२१) २६६२६०८
  • नाशिक – (०२५३) २५९२१४३
  • लातूर – (०२३८२) २५८२४१, २५९२५८
  • कोकण – (०२३५२) २२८४८०

उपाययोजना का

राज्यातील परीक्षा केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवावेत असा प्रस्ताव मागील वर्षी विचाराधीन होता. मात्र आता तो प्रस्ताव मागे पडला आहे. गेल्या तीन वर्षांत झालेल्या प्रश्नपत्रिकाफुटीच्या घटनांमध्ये केंद्रप्रमुख किंवा त्या शाळेतील मुख्याध्यापक जबाबदार असल्याचे आढळून आले होते.

ज्या वेळी मंडळाकडून केंद्रप्रमुखांकडे प्रश्नपत्रिका हस्तांतरित होते, त्याच दरम्यानच्या १५ ते २० मिनिटांच्या कालावधीत प्रश्नपत्रिका फुटत असे वा व्हायरल होत असे. म्हणून यंदा मंडळाकडून प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र अशी २५ प्रश्नपत्रिकांची लाखबंद पाकिटे तयार करण्यात आली आहेत. तसेच उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आकडय़ांच्या भाषेत.

राज्यातील १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. त्यात आठ लाख ३४ हजार १३४ विद्यार्थी आणि सहा लाख ५० हजार ८९८ विद्यार्थिनींचा समावेश आहे. नऊ हजार ४८६ कनिष्ठ महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली असून राज्यातील दोन हजार ८२२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.