९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत राज्यासह पुणे विभागातील निकाल घटला असला, तरी गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या अभ्याक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये चुरस निर्माण होणार असल्याचे चित्र आहे.

यंदा राज्यभरात ५ हजार ४८६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळवले. ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्यावर्षी ३ हजार ८१९ होती. केवळ पुणे विभागात यंदा ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७९० आहे. गेल्या वर्षी ही संख्या ४४४ होती. ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे वाढते प्रमाण हा गेल्या दोन वर्षांतील नवा पैलू असल्याचे दिसून येत आहे. राज्य मंडळाच्या परीक्षेसह सीबीएसई आणि आयसीएसई परीक्षेतही ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून आले होते. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेतील गुणांवर अवलंबून नसतात. मात्र, ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी व्यवस्थापन, वित्त, संगणक विज्ञान अशा अभ्यासक्रमांना प्राधान्य देतात. या पाश्र्वभूमीवर, हे अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या आणि विद्यार्थ्यांची पसंती असलेल्या महाविद्यालयांतील ‘कट ऑफ’ वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

विज्ञान शाखेचा ‘कट ऑफ’ नेहमीच जास्त असतो. मात्र, यंदा ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने विज्ञान शाखेशी संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी स्पर्धा वाढू शकते. यंदा एकूण निकालात घट असल्याने सर्वसाधारण प्रवेश प्रक्रियेत अडचण निर्माण होईल, असे वाटत नाही, असे फग्र्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी यांनी सांगितले.

खेळांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना अधिकचे गुण देण्यात आले आहेत. त्या व्यतिरिक्त ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण का वाढले, याचे नेमके कारण सांगता येणार नाही. मात्र, या विद्यार्थ्यांचा टक्का वाढतो आहे, ही वस्तुस्थिती आहे.

डॉ. शकुंतला काळे, अध्यक्षा, राज्य मंडळ