गौरींबरोबरच घरातील गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर गृहिणींना फुरसत मिळाली आणि गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी सहकुटुंब घराबाहेर पडलेल्या पुणेकरांमुळे शनिवारच्या रात्री गणेशोत्सवामध्ये अलोट गर्दीचा रंग भरला गेला. ध्वनिवर्धकाची परवानगी रात्री बारापर्यंत असली तरी रविवारच्या सुटीपूर्वीची रात्र सजावट पाहण्यामध्ये जागवीत अनेकांनी पहाटेच्या सुमारास घरी परतणे पसंत केले.

गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर सुवासिनींना माहेरवाशीण म्हणून येणाऱ्या गौरींच्या आगमनाचे वेध लागले होते. गौरी आवाहन, सजावट आणि गौरींचे पूजन यामध्ये दोन दिवस व्यग्र असलेल्या गृहिणींना शनिवारी गौरी विसर्जनानंतर मोकळीक मिळाली. कुलाचाराप्रमाणे अनेक घरांमध्ये गौरीबरोबर गणरायाचे विसर्जन होत असल्यामुळे तिन्हीसांजेला शहरातील विविध विसर्जन घाटांवर गर्दी झाली होती. ठिकठिकाणी ऐकू येणारे आरतीचे सूर आणि खिरापतीचा आस्वाद घेत विसर्जनानंतर नागरिक घरी परतले आणि सार्वजनिक मंडळांचे देखावे पाहण्याकरिता घराबाहेर पडण्यासाठी सज्ज झाले. गणपती पाहण्यासाठी अधिकाधिक वेळ मिळावा या हेतूने अनेक घरांमध्ये स्वयंपाकालाही सुटी देण्यात आली.

श्री कसबा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी या ग्रामदैवतांसह गुरुजी तालीम मंडळ, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली होती. साईनाथ मित्र मंडळाने सादर केलेला ‘तरुणांनो लष्करात भरती व्हा’ हा जिवंत देखावा, हत्ती गणपती मंडळाने महापुरुषांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करीत सादर केलेला ‘आदर करूया स्वातंत्र्याचा’ या देखाव्यांनी लक्ष वेधून घेतले.

संगीताच्या तालावर नर्तन करणारी नातूबाग मंडळाची विद्युत रोषणाई पाहताना गणेशभक्तांच्या पायांनी विसावा घेतला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजाननाच्या मूर्तीचे दर्शन घेतानाच या मंडळाचे देखावे डोळ्यांमध्ये साठवून घेतले. रस्त्याच्या कडेला असलेल्या छोटेखानी दुकानांतून खरेदी करण्याबरोबरच थकलेल्या पायांना ताजेतवाने करण्यासाठी पोटपूजा करून गणेशभक्त पुन्हा एकदा देखावे पाहण्यासाठी तयार झाले.