पुण्याच्या बाजारात दररोज १० हजार किलो आवक

पुणे : वेगवेगळ्या प्रकारची मिठाई आणि अनेक गोड पदार्थाची गोडी वाढविणाऱ्या बेदाण्याचे उत्पादन यंदा मुबलक  झाले आहे. मुबलक उत्पादनामुळे घाऊक बाजारात बेदाण्याच्या दरात मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षी बेदाण्याला चांगले भाव मिळाल्याने यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर बेदाण्याचे उत्पादन घेतल्याने भावात घसरण झाली आहे.

मार्केटयार्डातील भुसार बाजारात एक किलो बेदाण्याला दर्जानुसार १६० ते २४० रुपये असा भाव मिळात आहे. दीड महिन्यांपूर्वी घाऊक बाजारात बेदाण्याला २१० ते ३३० रुपये किलो असा भाव मिळाला होता. मार्केटयार्डातील घाऊक बाजारात सध्या सांगलीतील तासगाव, सोलापूर जिल्ह्य़ातील पंढरपूर, कर्नाटकातील विजापूर भागातून दररोज १० हजार किलो एवढी बेदाण्याची आवक होत आहे. मार्केटयार्डातील भुसार बाजारातून सुकामेव्याच्या किरकोळ  विक्रेत्यांना बेदाण्याची विक्री केली जाते, तसेच राज्याच्या वेगवेगळ्या भागात, परराज्यातही बेदाणा विक्रीसाठी पाठविला जात आहे, अशी माहिती सुकामेव्याचे घाऊक बाजारातील व्यापारी नवीन जिंदल यांनी दिली.

गेल्या वर्षी बेदाण्याला चांगला भाव मिळाला होता. यंदाच्या हंगामात चांगला भाव मिळण्याच्या आशेने शेतक ऱ्यांनी बेदाण्याचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले आहे. त्यामुळे बेदाण्याच्या भावात घसरण झाली आहे. मिष्टान्नांमध्ये बेदाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे शहरातील केटरिंग व्यावसायिक, मिठाई विक्रेते, किरकोळ व्यापारी यांच्याकडून तसेच मॉलमधून बेदाण्याला मोठी मागणी असते. गेल्या वर्षी बेदाण्याला दर्जानुसार १८० ते ३०० रुपये असा भाव मिळाला होता. दीड महिन्यांपूर्वी एक किलो बेदाण्याला २१० ते ३३० रुपये असा भाव मिळाला होता. दर्जानुसार १६० ते २४० रुपये किलो असा भाव मिळत आहे. जून-जुलैपर्यंत बेदाण्यांच्या भावातील घसरण सुरुच राहील, असेही जिंदल यांनी सांगितले.

द्राक्ष उत्पादक शेतक ऱ्यांचा कल

द्राक्षांपेक्षा बेदाण्याला जास्त भाव मिळत असल्याने बेदाणा उत्पादनाकडे शेतक ऱ्यांचा कल वाढला आहे. सणासुदीच्या काळात स्थानिक तसेच परराज्यातून राज्यातील बेदाण्याला मोठी मागणी असते. तासगाव, पंढरपूर भागातील बेदाणा आकाराने मोठा तर विजापूर भागातील बेदाणा गोल आणि छोटा असतो, असे सुकामेव्याचे व्यापारी नवीन जिंदल यांनी सांगितले.

अफगाणी बेदाणा अधिक गोड

मार्केटयार्डातील भुसार बाजारात अफगाणिस्तानातील बेदाण्याची आवक होते. अफगाणी बेदाणा चवीला गोड असतो. या बेदाण्याला प्रतिकिलो ३३० ते ३४० रुपये असा भाव मिळत आहे. भारतातील बेदाणा स्वस्त असल्याने ग्राहकांकडून स्थानिक बेदाण्याला मोठी मागणी असते.