नयनरम्य समुद्रकिनारे, बॅकवॉटर्स आणि विविध कलाविष्कारांचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या केरळच्या देशांतर्गत पर्यटनात तब्बल ४० टक्के वाटा महाराष्ट्रातल्या पर्यटकांचा आहे. महाराष्ट्रातही केवळ मुंबईच नव्हे तर पुण्यातील पर्यटकांचाही केरळला जाण्यात वरचा क्रमांक आहे. त्याचबरोबर नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद या शहरांमधूनही केरळला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत असून राज्यातून अधिकाधिक पर्यटक केरळला यावेत यासाठी केरळ पर्यटन मंडळाने कंबर कसली आहे.
पर्यटनाच्या प्रसारासाठी केरळ पर्यटन मंडळातर्फे शुक्रवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ही माहिती देण्यात आली. २०१४ मध्ये केरळला जाणाऱ्या देशांतर्गत पर्यटकांच्या संख्येत ७.७१ टक्क्य़ांनी वाढ होऊन ही संख्या १ कोटी १६ लाख झाली. ‘महाराष्ट्र हे आमच्यासाठी पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे राज्य आहे. केरळला येणाऱ्या देशांतर्गत पर्यटकांमध्ये ४० टक्के पर्यटक महाराष्ट्रातले आहेत. महाराष्ट्रात मुंबईसह पुणे केरळ पर्यटनासाठी महत्त्वाचे आहे. नागपूरमधूनही गेल्या दहा वर्षांत केरळला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असून नाशिक, औरंगाबादमधूनही पर्यटक येत आहेत,’ अशी माहिती केरळ पर्यटन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ‘केरळला येणारे परदेशी पर्यटक विशिष्ट कालावधीतच येणे पसंत करतात. मात्र देशांतर्गत पर्यटक वर्षभर येतात. दिवाळीच्या सुटय़ा, डिसेंबर- जानेवारी आणि एप्रिलपासून लागणाऱ्या सुटय़ांमध्ये अधिक पर्यटक येतात, तर फेब्रुवारीत मधुचंद्रासाठी येणाऱ्या जोडप्यांची संख्या मोठी असते. जून ते ऑगस्ट हे पावसाचे दिवस असले तरी पावसात केरळचे सौंदर्य वेगळेच असते. या काळात पर्यटकांना अधिक सवलतींच्या दरात केरळ पर्यटन करता येईल,’ असेही ते म्हणाले.
केरळला जाणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्याही २०१४ मध्ये ७.६० टक्क्य़ांनी वाढून ९ लाख २३ हजार झाली आहे. केरळ पर्यटन मंडळाचे संचालक पी. आर. शेख परिंथ म्हणाले, ‘‘आम्ही केरळमधल्या पर्यटनस्थळांसाठी नुकतीच ‘क्यू आर कोड’ (क्विक रिस्पॉन्स कोड) वापरून माहिती शोधण्याच्या यंत्रणेचे नुकतेच अनावरण केले. यात पर्यटनस्थळावर लावलेला किंवा पर्यटनविषयक मासिकांवर छापलेला ‘क्यू आर कोड’ पर्यटक मोबाईलद्वारे ‘स्कॅन’ करु शकेल. या यंत्रणेद्वारे पर्यटकाला त्या स्थळाच्या ५० किमीच्या परिघातील उपयुक्त माहिती कळू शकेल.’’