पिंपरी महापालिकेने महिन्यापूर्वी सुरू केलेल्या ‘सारथी’ हेल्पलाईनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. माहिती घेण्यासाठी तसेच विविध तक्रारी करण्यासाठी एका महिन्यात तब्बल पाच हजार नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. हेल्पलाईनची उपयुक्तता लक्षात घेता ही योजना केवळ पालिकेपुरती मर्यादित न ठेवता महसूल, आरटीओ, प्राधिकरण, पासपोर्ट, रेशन, गॅस, अन्न-भेसळ, पीएमपी, डोमिसाईल, वीजमंडळे आदी कार्यालयातील सविस्तर माहिती या माध्यमातून देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
सहायक आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संकल्पनेतून आलेल्या हेल्पलाईन (८८८८००६६६६) उपक्रमाचे १५ ऑगस्टला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. गेल्या महिन्याभरात माहिती घेण्यासाठी ३३४३ दूरध्वनी आले. तर, तक्रारी नोंदविण्यासाठी १४५१ अशा एकूण ४७९४ नागरिकांनी हेल्पलाईन सुविधेचा लाभ घेतला. याशिवाय, वेबसाईटला भेट देणाऱ्यांची संख्या १५ हजार १२४ इतकी आहे. प्राप्त १४०० तक्रारींपैकी ८२५ तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून ५७५ तक्रारींच्या निवारणाची कार्यवाही सुरू आहे, असे ते म्हणाले. आयुक्तांनी सोमवारी याबाबतचा आढावा घेतला. सद्य:स्थितीत पालिकेच्या २८ विभागांची माहिती तसेच त्यासंदर्भातील तक्रारी स्वीकारण्यात येतात. यापुढे विवाह नोंदणी, मतदार नोंदणी, नागरवस्ती विभागातील योजना आदी विभागांचा समावेश करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. ही योजना पालिकेविषयी माहिती देण्यासाठी असताना अनेक नागरिक अन्य शासकीय विभागांची माहिती विचारतात, असे निदर्शनास आल्याने नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या अन्य शासकीय कार्यालयांची माहिती हेल्पलाईनच्या माध्यमातून दिली जाणार आहे. येत्या १५ दिवसात ही माहिती संकलित करण्यात येईल व नंतर ती उपलब्ध करून दिली जाईल, असे डॉ. टेकाळे यांनी स्पष्ट केले.