महापालिकेकडून लावण्यात आलेल्या स्थानिक संस्था कराला विरोध करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या व्यापारी संघटनांच्या बेमुदत बंद दरम्यान बुधवारी सकाळी लक्ष्मी रस्त्यावर मानवी साखळी करण्यात आली.
स्थानिक संस्था कर (लोकल बॉडी टॅक्स – एलबीटी) हटेपर्यंत आंदोलन करण्याचे व्यापारी संघटनांनी जाहीर केले असून त्यानुसार बुधवारी मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी दहा वाजता टिळक चौकापासून या साखळीला प्रारंभ करण्यात आला. बेमुदत बंदमुळे लक्ष्मी रस्त्यावर कडकडीत बंद होता आणि सर्व व्यापारी आपापल्या दुकानांबाहेर येऊन उभे होते. साखळीला प्रारंभ झाल्यानंतर मोठय़ा संख्येने जमलेले व्यापारी तसेच या आंदोलनात भाग घेण्यासाठी शहरभरातून आलेले व्यापारी हातात घालून साखळीत सहभागी होत गेले. एलबीटी हटाव ही घोषणा असलेल्या पांढऱ्या टोप्या सर्वानी घातल्या होत्या.
पूर्वनियोजनाप्रमाणे लक्ष्मी रस्त्यावरील एकेक चौकाच्या अंतरात संघटनांचे सभासद भागात साखळीत सहभागी झाले होते. रस्त्याच्या एका बाजूला दुकानांसमोर करण्यात आलेली साखळी टिळक चौक ते बेलबाग चौक ते कॅम्पपर्यंत पोहोचली होती. तसेच साखळी बघण्यासाठी नागरिकांचीही गर्दी झाली होती. विविध संघटनांनी एलबीटीला विरोध करणारे फलकही या वेळी लावले होते.