फडमालक कर्जबाजारी; दुसऱ्या हंगामात लोककला ठप्प

 

पुणे : महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल लोककला असलेला तमाशा करोनाच्या विळख्यात सापडून मरणासन्न अवस्थेला पोहोचला आहे. गुढीपाडवा ते बौद्ध पौर्णिमा हा यात्रा-जत्रांचा मुख्य तमाशा हंगाम सलग दुसऱ्या वर्षी हातचा गेल्याने फडमालक कर्जबाजारी झाले आहेत. कलाकारांची अवस्था तर त्याहीपेक्षा बिकट आहे. अनेकांची उपासमार होत आहे. कुटुंबाची गुजराण करण्यासाठी काहींनी मजुरीसह गावोगावी फिरून भाजीपाला आणि लहान-मोठ्या वस्तूंची विक्री सुरू केली होती, पण कठोर निर्बंधांमुळे त्यालाही फटका बसला.

रात्रीच्या वेळमर्यादेमुळे तमाशाला आधीच घरघर लागली होती. त्यातही ही कला टिकवण्यासाठी फडमालक आणि कलाकार प्रयत्न करीत होते. त्यातून राज्यात ८२ छोटे-मोठे तमाशा फड आणि त्यावरील शेकडो कलाकार तग धरून होते. त्यातच गेल्या वर्षी ऐन यात्रा-जत्रांच्या हंगामाच्या तोंडावर करोनाची पहिली लाट आली. फडमालकांनी सावकारांकडून कर्ज घेऊन कलाकारांना पहिला हप्ता दिला होता. मात्र, कमाई सुरू होण्यापूर्वीच संपूर्ण टाळेबंदी जाहीर झाली आणि फडमालक हवालदिल झाले. कमाईच नसल्याने डोक्यावरचा कर्जाचा डोंगर व्याजाने वाढत गेला. आता दुसरा हंगामही हातचा गेल्याने अक्षरश: उपासमारीची वेळ आल्याची अगतिकता अनेक कलाकारांनी व्यक्त केली.

यात्रा-जत्रांखेरीज दसऱ्यापासून वर्षाचा हंगाम सुरू होत असतो. या कालावधीत गुढीपाडव्यापर्यंत गावोगावी तंबूत तिकिटे लावून तमाशाचे खेळ होतात. पाडव्यानंतर गावोगावच्या जत्रांमध्ये तमाशा होतो. पहिल्या लाटेतील परिस्थिती सुधारल्यानंतर नाटक, चित्रपटगृहेही सुरू झाली. त्यामुळे तमाशालाही परवानगी देण्याच्या मागणीसाठी तमाशा परिषदेने आंदोलन केले. तमाशाला परवानगी देण्याचा निर्णय झाला असतानाच करोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा कठोर निर्बंध लागू झाले.

सरकारकडून मदतीची गरज

तमाशाच्या स्थितीबाबत अखिल भारतीय लोककलावंत मराठी तमाशा परिषदेचे कार्याध्यक्ष संभाजीराजे जाधव म्हणाले की, कलाकारांना सध्या कोणतेही काम नसल्याने ते आमच्याकडे कामाची मागणी करतात; पण फडमालकच कर्जात बुडाला आहे. अनेक कलाकारांचा करोनाने मृत्यू झाला. चौघांनी आत्महत्या केली आहे. काही कलाकार कुटुंबाला जगविण्यासाठी मजुरीसह मिळेल ते काम करीत आहेत. तमाशा कलावंतांना शासनाकडून मदतीची गरज आहे.

चित्रपट, नाटकांना अनुदान दिले जाते; पण तमाशा उपेक्षित आहे. तमाशा कलावंत आणि फड उभे करण्यासाठी आता शासनाच्या अनुदानाशिवाय पर्याय नाही. – संभाजीराजे जाधव, फडमालक आणि कार्याध्यक्ष, अखिल भारतीय लोककलावंत मराठी तमाशा परिषद