पुणे : दक्षिण पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही काही प्रमाणात फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दक्षिण कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि मध्य-पश्चिाम महाराष्ट्रात १५ आणि १६ मे रोजी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

चक्रीवादळ तयार होत असताना लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक किनारपट्टी आणि तमिळनाडूच्या काही भागांत अतिवृष्टी होत आहे. चक्रीवादळ संभाव्य मार्गाने गुजरातच्या दिशेने जात असताना १५ ते १७ मे दरम्यान ते महाराष्ट्र किनारपट्टीला समांतर जाणार आहे. त्यामुळे कोकणात प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी आणि तीव्र वादळ असणार आहे. १५ आणि १६ मे रोजी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथेही सोसाट्याचा वारा आणि पाऊस असेल. याच कालावधीत मुख्यत: पश्चिाम महाराष्ट्रातील घाटक्षेत्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील घाटक्षेत्रातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. १८ मे रोजी सकाळी चक्रीवादळ गुजरात किनारपट्टीपर्यंत जाणार असल्याने या भागांत ताशी ११५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून, अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

वादळभान…

अरबी समुद्रात केरळपासून ३६० किलोमीटर अंतरावर सध्या कमी दाबाचे तीव्र क्षेत्र आहे. पुढील २४ तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार असून, त्यानंतर दोन दिवस ते अतितीव्र होणार असल्याचे संकेत आहेत.

मोसमी वारे ३१ मे रोजी केरळमध्ये

अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीला पोषक स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे मोसमी वाऱ्यांचे केरळमधील आगमन नियोजित वेळेपूर्वी होऊ शकते. हवामान विभागाने नव्याने दिलेल्या अंदाजानुसार २१ मेपर्यंत मोसमी वारे अंदमान बेटांवर सक्रिय होण्याची शक्यता असून, ते ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. २०२० मध्ये १ जूनला, तर २०१९ मध्ये ६ जूनला मोसमी वारे केरळात दाखल झाले होते.

सलग चौथ्या वर्षी…

अरबी समुद्रात पूर्वमोसमी काळात २०१८ पासून सलग चौथ्या वर्षी चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. हवामानाचा आढावा घेण्यासाठी १९८० पासून उपग्रहाचा वापर सुरू झाला. उपग्रहाद्वारे नोंदी ठेवण्याचा कालखंड सुरू झाल्यापासून पूर्वमोसमी काळात सलग चार वर्षे चक्रीवादळाची निर्मिती होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भीती का?

’प्राथमिक अंदाजानुसार चक्रीवादळाचा संभाव्य मार्ग ओमानच्या दिशेने होता. त्यामुळे महाराष्ट्र किंवा गुजरातला त्याचा फटका बसणार नसल्याचे दिसून येत होते. मात्र, सध्याच्या अंदाजानुसार चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीकडे जाण्याचे संकेत आहेत.

’त्यामुळे ते समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ असेल. परिणामी किनारपट्टीच्या भागात ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वादळी वारे आणि अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईतील करोना  रुग्णालये सतर्क…

‘तौत्के’ चक्रीवादळामुळे मुंबईत पर्जन्यवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे ऐनवेळी गोंधळ होऊ नये म्हणून पालिकेने मोठ्या करोना रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील ३९५ रुग्णांना अन्य रुग्णालयात स्थलांतरीत करण्याचे नियोजन केले आहे. तसेच चक्रीवादळाच्या पाश्र्वाभूमीवर शनिवारी आणि रविवारी मुंबईतील लसीकरणही बंद ठेवण्यात आले आहे.