करोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात मोठ्या प्रमाणावर वाढला असून रूग्णांची संख्या १२ हजारांच्या पार गेली आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून देशात तीन मेपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. लॉकडाउनच्या या काळात पत-पत्नीमध्ये वादाचे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. पुणे जिल्ह्यातही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. पती-पत्नीच्या भांडणावर पुणे जिल्हा परिषदेने गावा गावात महिला दक्षता समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी हा लेखा आदेश काढला आहे.

करोना विषाणूमुळे देशभरात लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर अनेक मुद्दे समोर आले आहे. त्यातील आता कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणाकडे प्रशासन गांभिर्याने पाहत आहे. अशाच घटना पुणे जिल्ह्यात समोर आल्या असून जिल्हा परिषदे मार्फत यावर तोडगा काढण्यासाठी महिलांची दक्षता समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

या समितीमध्ये गावातील ग्रामपंचायत समिती सदस्या, अंगणवाडी सेविका, महिला बचत गटातील सदस्या, अंगणवाडी मदतनीस यांचा समावेश करण्यात आला आहे. या समिती मार्फत समुपदेशनाद्वारे पतीला समज दिली आहे. समज देऊन देखील पती कायम वाद करीत राहिल्यास अशा पतीला पोलिसांच्या मदतीने थेट संस्थात्मक क्वरांटाईन केले जाणार असल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी काढलेल्या लेखी आदेशात म्हटले आहे.