पती-पत्नीतील किरकोळ वाद विकोपाला जाऊन रागाच्या भरात पतीने पत्नीची कोयत्यानं हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी स्वतःच पोलीस ठाण्यात हजर झाला. पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव परिसरात ही घटना घडली. पत्नी पोलीस ठाण्यात जाण्याची धमकी देत असल्यानं आरोपीनं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

मयत शैला लोखंडे (वय ४५) आणि आरोपी हनुमंत लोखंडे (वय ५९) अशी दोघांची नावे आहेत. ते पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव परिसरात वास्तव्यास आहेत. लोखंडे दाम्पत्य तळमजल्यावर राहतात, तर त्यांचा मुलगा शिवाजी हनुमंत लोखंडे दुसऱ्या मजल्यावर राहतो. आरोपी हनुमंत लोखंडेचा शैला ही तिसरी पत्नी होती, अस पोलिसांकडून सांगितलं.  त्यांच्यात किरकोळ कारणावरून सातत्यानं वाद होत असत.  सोमवारीही पहाटेच्या सुमारास आरोपी हनुमंत आणि शैला यांच्यात वाद सुरू झाला. मयत शैला या प्रत्येक वादावेळी आरोपीला पोलिसात जाण्याची धमकी देत असत. याच रागातून सोमवारी एकदाचा कारागृहात जातो, असं म्हणत पत्नी शैला मारहाण करायला सुरूवात केली.

सावत्र आईचा आवाज ऐकून सावत्र मुलगा शिवाजी लोखंडे हा धावत खाली आला. मात्र, खोलीचा दरवाजा आतून बंद होता. खिडकीचा काच हाताने फोडून शिवाजीने वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वडिलांनी त्यांच्यासमोरच कोयत्याने वार करून खून केला. शैला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह तसाच ठेवून आरोपीनं खोली बंद करून घेतली. त्यानंतर आरोपी हनुमंत हा सांगवी पोलीस ठाण्यात गेला. तिथे त्याने पोलिसांना घडलेल्या घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली. याप्रकरणी मुलगा शिवाजी हनुमंत लोखंडे याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर हे करत आहेत.