X
X

मुलांसमोरच पतीने केला गर्भवती पत्नीचा खून

READ IN APP

स्वतःवरही वार करून केला आत्महत्येचा प्रयत्न

आठ महिन्याच्या गर्भवती पत्नीचा कुऱ्हाडीने घाव घालून खून करत स्वतः पतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पिंपरी-चिंचवडच्या फुगेवाडीत घडली आहे. दुर्देव म्हणजे हा सर्व थरार पोटच्या मुलांसमोर घडला आहे. ही घटना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत. पूजा घेवंदे (वय-२५) असे मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव असून प्रवीण घेवंदे (वय-२८) असे आरोपी पतीचे नाव आहे.

पतीची तब्बेत ठीक नसल्याने त्याला पाहाण्यासाठी पूजा औरंगाबाद येथून आली होती. मात्र, ती घरी पोहचल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवीण हा काही दिवसांपासून मानसिक संतुलन बिघडल्यासारखं वागत होता. त्यामुळे माहेरी बाळंतपणासाठी गेलेली पूजा ही रविवारी औरंगाबाद येथून आईला सोबत घेऊन पतीला भेटण्यासाठी आली होती. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ती फुगेवाडी येथे पोहचली. यानंतर अनेक दिवसांनी आलेल्या आईला तिची साडेतीन आणि दोन वर्षाची मुलं बिलगली व तिच्या जवळ बसली होती. यावेळी बेसावध असलेल्या पूजाच्या मानेवर अचानकपणे पती प्रवीणने उलट्या कुऱ्हाडीने जोरदार प्रहार केला. यात ती गंभीर जखमी झाल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला. शिवाय या घटनेत एका मुलाला कुऱ्हाडीचा दांडा लागल्याने त्यालाही दुखापत झाली.

दरम्यान, हे कृत्य केल्यानंतर प्रवीणने स्वतःवर धारदार शस्त्राने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रवीणने पत्नीला ठार मारून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न का केला? हे अद्याप अस्पष्ट आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घेवंदे कुटुंब हे मजूरी काम करत होते.

21
X