पत्नीने स्वयंपाक बनवला नसल्याच्या कारणावरुन दारूच्या नशेत असलेल्या पतीने लाकडी दांडक्याने आणि दगडाने बेदम मारहाण करुन पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना तळेगाव येथे बुधवारी रात्री घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, शारदा अशोक चौरे (वय ४०) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून तिचा पती अशोक चौरे (वय ४५) याला पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नवलाख उंब्रे येथे ही घटना घडली. आज याप्रकरणी तळेगाव एमआयडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी देवेश शंकर वाघमारे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. मृत महिला शारदा चौरे आणि तिचा पती अशोक हे नवलाख उम्ब्रे येथील भगवान संतू दरेकर विटभट्टीवर काम करतात आणि तिथेच सध्या वास्तव्यास आहेत. बुधवारी रात्री अशोक याने पत्नी शारदा हीला नेहमीप्रमाणे स्वयंपाक करण्यास सांगितले. मात्र, दारु पिऊन घरी परतल्यानंतर शारदा यांनी स्वयंपाक बनवलेला नाही हे पाहताच चिडलेल्या अशोकने चिडून शारदा यांना लाकडी दांडक्याने पाठीत, हाता-पायांवर बेदम मारहाण केली. तसेच डोक्याला दगड मारुन मारुन गंभीर जखमी केले, या प्रचंड मारहाणीमुळे शारदा यांचा मृत्यू झाला.