पुणे : सिंहगड रस्ता भागातील नऱ्हे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या वादातून महिला सरपंचाच्या पतीला मोटारीची धडक दिल्यानंतर या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात यापूर्वी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती.

दहा दिवसांपूर्वी बाळासाहेब सोपान वनशिव (वय ५२) आणि त्यांचे मित्र प्रकाश टिळेकर पहाटे साडेपाचच्या सुमारास मुंबई-बंगळुरू बाह्य़वळण मार्गावर फिरायला गेले होते. त्या वेळी सेवा रस्त्यावर वनशिव यांच्या अंगावर मोटार धडकवण्यात आली. या घटनेत ते जखमी झाले होते. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या वनशिव यांचा उपचारांदरम्यान रविवारी मृत्यू झाला. वनशिव यांची पत्नी नऱ्हे ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत. वनशिव यांच्या पत्नीने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आरोपी अविनाश कैलास कांबळे (वय ३९, रा. विठ्ठल कलावती निवास, नऱ्हे गाव) याच्या पत्नीचा पराभव केला होता. तेव्हापासून वनशिव आणि कांबळे यांच्यात वाद सुरू होता. त्यांच्यात एका जमिनीवरून देखील वाद होता.

या प्रकरणी वनशिव यांच्या पत्नीने पोलिसांकडे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. राजकीय तसेच जमिनीच्या वादातून अपघाताचा बनाव करत आरोपी कांबळे आणि साथीदारांनी पतीच्या  खुनाचा प्रयत्न केल्याची फिर्याद वनशिव यांच्या पत्नीने दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास करून पसार झालेल्या कांबळेसह साथीदार  नितीश कैलास थोपटे (वय ३०,रा. धायरी) यांना अटक केली होती.

या प्रकरणात सुरुवातीला  खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वनशिव यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी आरोपीं विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आणखी पाच आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार तपास करत आहेत. या प्रकरणात पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.