दुसऱ्या तुकडीत पुणेकर तनय मांजरेकरचा आज प्रवास; चाचणीसाठी वापरण्यात आलेले वाहन दोन प्रवासी क्षमतेचे

पुणे : अमेरिके तील डेवलूप टेस्ट फॅसिलिटी येथे हायपरलूपमधून सोमवारी (९ नोव्हेंबर) पहिल्या मानवी तुकडीने यशस्वी प्रवास केला. व्हर्जिन हायपरलूपचे सहसंस्थापक, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी जोश गिगेल आणि प्रवासी अनुभवविषयक संचालक सारा लुचिअन हे हायपरलूपमधून प्रवास करणारे जगातील पहिले प्रवासी ठरले. दुसऱ्या फे रीत हायपरलूपमधून प्रवास करणारे तनय मांजरेकर हे पुणेकर असून ते  मंगळवारी प्रवास करणार आहेत.

या चाचणीसाठी तयार करण्यात आलेले एक्सपी-दोन हे वाहन सुरक्षितताविषयक निकष प्रक्रियेतून तयार झाले असून अद्ययावत नियंत्रण यंत्रणेने युक्त आहे.

बियाका इंगल्स समूहाच्या आरेखनातून हे वाहन साकारले असून व्यावसायिक स्वरुपात बनवण्यात येणारे वाहन २८ आसन क्षमतेचे असेल. चाचणीसाठी वापरण्यात आलेले वाहन दोन प्रवासी क्षमतेचे होते.

याबाबत व्हर्जिन समूहाचे संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन म्हणाले, ‘गेली काही वर्षे व्हर्जिन हायपरलूप चमू आपले एकमेवाद्वितीय तंत्रज्ञान प्रत्यक्षात आणण्यासाठी मेहनत घेत आहे. येणाऱ्या काही वर्षांत जगभरातील लोकांचे राहणीमान, काम आणि प्रवासाचे स्वरुप बदलणार असल्याचे या चाचणीद्वारे आम्ही दाखवून दिले आहे.’

‘हायपरलूपमधून मानवी प्रवासाची चाचणी हा व्यावसायिक तत्त्वावर प्रकल्प सुरू होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाला समांतर पद्धतीने पुण्याला मुंबईशी जोडले जाणार आहे. महाराष्ट्रात पायाभूत सुविधा क्षेत्रातील सर्वात मोठी गुंतवणूक होणार असून १८ लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीबरोबरच ३६ अब्ज डॉलर एवढय़ा मूल्याचे सामाजिक व आर्थिक लाभ या प्रकल्पातून मिळणार आहेत’, असे हायपरलूपचे मध्य पूर्व व भारताचे व्यवस्थापकीय संचालक हर्ज धलिवाल यांनी सांगितले.

तनय मांजरेकर यांची ओळख.

हायपरलूप तंत्रज्ञानाच्या विकसनात तनय मांजरेकरने विद्युत अभियांत्रिकीची जबाबदारी निभावली आहे. तसेच सर्वात पहिल्यांदा चाचणीमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींपैकी तो एक आहे. सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिके शन शाखेत अभियांत्रिकीची पदवी घेतल्यावर तनयने युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅ लिफोर्नियातून विद्युत अभियांत्रिकी शाखेत पदव्युत्तर पदवी प्राप्त के ली. त्यानंतर २०१६पासून तनय व्हर्जिन हायपरलूपमध्ये काम करतो आहे. ‘हायपरलूपवर काम करणे आणि यातून प्रथम प्रवास करणाऱ्यांपैकी एक असणे हे माझ्यासाठी स्वप्नच प्रत्यक्षात आल्यासारखे आहे. भारत हे आव्हान स्वीकारून जगाच्या अनेक मैल पुढे जाण्याची आपल्यासमोर असलेली ही अपूर्व संधी ओळखेल आणि पुणे-मुंबई हायपरलूप प्रकल्पाबाबतची प्रगती सुरू ठेवेल, अशी मला आशा आहे,’ असे तनयने  सांगितले.

हायपरलूप तंत्रज्ञान म्हणजे काय?

या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हवेच्या पोकळीतून मेट्रोसारख्या रेल्वेतून प्रवास करणे शक्य होते. त्यासाठी विशिष्ट आकार आणि स्वरुपाच्या टय़ुबची निर्मिती के ली जाते. त्याचे डबे कॅ प्सूलसारखे असतात. चुंबकीय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार

केलेल्या रुळांवरून ही रेल्वे धावते. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) पुणे-मुंबई दरम्यान हायपरलूप प्रकल्प राबवण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या यशस्वी मानवी चाचणीमुळे पुणे-मुंबई दरम्यानच्या प्रकल्पाला चालना मिळण्याची शक्यता आहे.