संगीतातील गुरू परंपरेची मी केवळ लेखणी आहे. गुरू माझ्याकडून लिहून घेतात. त्या लेखनाला रसिक दाद देतात हा त्या गुरू परंपरेचा सन्मान आहे, अशी भावना जयपूर-अत्रौली घराण्याच्या प्रसिद्ध गायिका श्रुती सडोलीकर-काटकर यांनी रविवारी व्यक्त केली. पाच-दहा रागांच्या शिदोरीवर कुणी आयुष्यभर संगीत करू शकत नाही. खरे गुरू शिकवितात आणि नंतर केवळ मार्ग दाखवून त्यावरून तुम्हाला चालायला लावतात. पूर्ण विश्वास असल्याखेरीज गुरू आपल्या शिष्याला सर्व विद्या देत नाही, असेही त्या म्हणाल्या.
गानवर्धन संस्थेतर्फे तात्यासाहेब नातू फाउंडेशनच्या सहकार्याने किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते श्रुती सडोलीकर-काटकर यांना स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शं. ना. नवलगुंदकर, ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक मुकुंद संगोराम, प्रसिद्ध गायक चंद्रकांत काळे, फाउंडेशनचे शारंग नातू, गानवर्धनचे अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी आणि दयानंद घोटकर या प्रसंगी व्यासपीठावर होते. सुरंजन खंडाळकर याला यशवंत व लीला करंदीकर स्मृती पुरस्कार आणि रमाकांत गायकवाड यांना डॉ. श्रीरंग संगोराम स्मृती शास्त्रीय गायन पुरस्कार या वेळी प्रदान करण्यात आला.
गायनाबरोबरच उत्तम शैक्षणिक कारकीर्द असलेल्या डॉ. प्रभा अत्रे यांचे उदाहरण देत ‘गाण्याचे करीअर करण्याआधी विद्या संपादन कर’, असे माझे वडील पं. वामनराव सडोलीकर यांनी मला सांगितले होते. मुंबईच्या पोद्दार कॉलेजमधील प्रभाताईंच्या मैफलीतील राग शंकरा अजूनही मला आठवतो, असे सांगून श्रुती सडोलीकर म्हणाल्या, महिलांना गायन हे जीवनाचे ध्येय निवडताना तडजोडी कराव्या लागतात. काही वेळा आपला इलाज नसतो. तर, कधी जबाबदारीच्या जाणिवेमुळे तडजोड स्वीकारावी लागते. मात्र, त्यावर मात करण्याचे धैर्य गुरू परंपरा देते. पुन्हा जन्म मिळणार असेल तर तो गाण्यासाठीच मिळावा हीच इच्छा आहे.
डॉ. प्रभा अत्रे म्हणाल्या, कलाकार एकांतात जगू शकत नाही. एकांतामध्ये तो साधक असतो. श्रोत्यांची साथ लाभते तेव्हा सुरवंटाचे फुलपाखरू होते त्याप्रमाणे साधकाचा कलाकार होतो. जागतिकीकरणाच्या प्रवाहामध्ये भारतीय संस्कृती आणि कलेचे जतन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वावर आहे हे ओळखले पाहिजे.
हा व्यक्तीच्या अंगी असलेल्या गुणात्मकतेचा सन्मान असल्याचे सांगून डॉ. नवलगुंदकर म्हणाले, भारताने केवळ बौद्धिक क्षेत्रातच नव्हे तर, सांस्कृतिक क्षेत्रातही जगाचे नेतृत्व करावे.
संगोराम म्हणाले, प्रभाताई आणि श्रुतीताई या दोघींनी आयुष्यामध्ये केवळ संगीताचा ध्यास घेतला. त्यांनी संगीत वाढविले, टिकविले. एवढेच नव्हे तर, आपल्या प्रतिभेने त्यामध्ये भर घातली. संगीताचे सौंदर्यशास्त्र उलगडण्याचे सामथ्र्य या दोघींमध्ये आहे.
उत्तरार्धात श्रुती सडोलीकर-काटकर यांच्या गायनाची मैफल झाली. त्यांना सुयोग कुंडलकर यांनी हार्मोनिअमची आणि मंगेश मुळे यांनी तबल्याची साथसंगत केली. प्राची घोटकर यांनी सूत्रसंचालन केले.