राजकीय व्यक्ती व पक्षांवर आपण कितीही विडंबना करत असलो तरी कोणताही अनुभव मागे राहू नये म्हणून राजकारणाचाही अनुभव आपण घेतला. गावाकडे जनता दलाच्या तिकिटावर निवडणूक लढली, आपण खूपच लोकप्रिय आहोत, असे वाटत होते. मात्र, ज्या पध्दतीने पराभूत झालो, तेव्हाच खरी ‘लोकप्रियता’ समजली, अशी कबुली साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांनी देहूत बोलताना दिली.
देहूत रामकृष्ण मोरे फाऊंडेशनच्या व्याख्यानमालेचा समारोप शिंदेंच्या ‘विनोद- एक दृष्टिकोन’ या व्याख्यानाने झाला, तेव्हा ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार लक्ष्मण जगताप होते. पत्रकार गोविंद घोळवे, माउली दाभाडे, बबनराव भेगडे, रवी चौधरी, रामदास मोरे, सुहास गोलांडे, अशोक मोरे, कांतिलाल काळोखे, प्रा. नामदेव जाधव, नाना शिवले, हरिभाऊ चिकणे उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, जनता दलाचे चक्र चिन्ह घेऊन निवडणूक लढवली. त्यावेळी इतर उमेदवारांचे जे झाले, तेच माझे कळंबमध्ये झाले. तुम्ही लोकप्रिय कवी असताना राजकारणात कशाला आलात, अशी विचारणा अनेकांनी केली. निवडणुकीत लढल्याशिवाय आणि पडल्याशिवाय आपण किती ‘लोकप्रिय’ आहोत, हे कळत नाही. वास्तविक निवडून येण्याच्या वाईट हेतूने उभा राहिलोच नव्हतो, असे सांगत आजोळच्या लोकांनी शिवसेनेच्या तिकिटाचा का विचार केला नाही, अशी विचारणा केल्यानंतर निरूत्तर झाल्याचेही फ.मुं.नी गमतीने सांगितले. विलासराव देशमुख, रामकृष्ण मोरे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतानाच फ.मुं.नी विनोदाची व्याख्या, लबाड लिहिणारे, वयावर नव्हे तर सवयीवर असलेले तारुण्य, समजून घेणे म्हणजे काय, जनतेचे राज्य, बाई-खुर्चीला आवडतात चारित्र्यवान माणसे असे अनेक भन्नाट किस्से, कविता, वात्रटिका सांगितल्या. गालावर तीळ असल्यावर सात जणांनी कसे खायचे असे सांगत त्यांनी केलेल्या समाजवादाच्या व्याख्येला दाद मिळाली. सुनील कंद यांनी सूत्रसंचालन केले.

पिंपरीच्या उभारणीत मोरेंचा सिंहाचा वाटा
पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा पाया रामकृष्ण मोरे यांनी रचला, शहराच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. दूरदृष्टी ठेवून त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे गरजेच्या नागरी सुविधा उपलब्ध करून देता आल्या, अशी भावना लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केली. मोरेंना आणखी आयुष्य लाभले असले तर ते मुख्यमंत्री झाले असते, अशी टिप्पणी त्यांनी केली.