पुण्यातील मेट्रो ३ मार्गिकेच्या भूमिपूजन सोहळ्यात अनुपस्थित राहणारे भाजपाचे राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून पुणे लोकसभा मतदारसंघातील जागा लढवणार असल्याचा दावा केला. माझे मेरिट पाहता भाजपा मलाच संधी देईल, असे त्यांनी म्हटले आहे.

पुण्यातील वाडेश्वर कट्टयावर पुण्याचा भावी खासदार कोण ? यावर चर्चा रंगली. संजय काकडे, मोहन जोशी, बाबू वागसकर, राष्ट्रवादी प्रवक्ते अंकुश काकडे, शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे आदी नेतेमंडळी उपस्थित होती. ‘ब्रेकफास्ट पे चर्चा’वर या नेत्यांमध्ये राजकीय गप्पांचा फड रंगला. पुण्याचा भावी खासदार कोण, याप्रश्नावर संजय काकडे म्हणाले, मी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून पुण्याची जागा लढवणार आहे. माझा मेरिट पाहता पक्ष मला संधी देईल आणि मी आता पर्यंत दीड लाख सभासद केले आहे. मी आता जनतेमधून संसदेत जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

मंगळवारच्या भूमिपूजन सोहळ्यात संजय काकडे अनुपस्थित होते. मुंबईतदेखील भाजपाने सहयोगी पक्षांना निमंत्रण दिले नव्हते आणि पुण्याच्या कार्यक्रमाला मला बोलवलं नाही म्हणून गेलो नाही, असे काकडे यांनी सांगितले.

दरम्यान, संजय काकडे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. राम मंदिराचं राजकारण सोडून आता भाजपाने विकासाकडे वळलं पाहिजे असा घरचा अहेर त्यांनी दिला होता.